जयेश सामंत

अहवालाद्वारे करोना बाधित नसताना संशयित रुग्णाला करोना झाल्याचे भासवून महागडय़ा रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पाठविण्याचा घाट  खासगी प्रयोगशाळा करीत आहेत का, असा संशय ठाण्यात उघड झालेल्या प्रकरणांतून व्यक्त होत आहे.

सरकारमान्य खासगी प्रयोगशाळांकडून सादर होणाऱ्या  करोना रुग्णांच्या अहवालात सातत्याने सदोष निष्कर्ष काढले जात असल्याचे प्रकार पुढे येऊ लागल्याने स्थानिक स्वराज्य संस्था सावध झाल्या आहेत.  ठाणे शहरात पाच संशयीत रुग्णांच्या अहवालात अशा गफलती आढळून आल्याने महापालिकेने संबंधित प्रयोगशाळेला तातडीने नोटीस बजावली असून कोणतीही लक्षणे नसताना केवळ अहवाल होकारात्मक आल्याने खासगी कोविड रुग्णालयातील महागडय़ा उपचारांना सामोरे जावे लागलेल्या प्रकरणांचा यानिमीत्ताने महापालिका स्तरावर अभ्यास केला जात आहे. या प्रकरणांमध्ये काही रुग्णालये आणि प्रयोगशाळा संगनमताने गैरप्रकार तर करीत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या केंद्र सरकारच्या संस्थेने वेगवेगळ्या राज्यांमधील ठराविक खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणीचे अधिकार प्रदान केले आहेत. या चाचण्यांचा वेग वाढावा आणि अधिकाधिक निष्कर्ष पुढे यावेत हा मागील मुख्य उद्देश आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्येही अशाच काही खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर करोना संशयीतांच्या सशुल्क चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांचे अहवाल पुढे महापालिका अथवा स्थानिक आरोग्य यंत्रणेस सादर केले जातात. अशाच एका सरकारमान्य खासगी प्रयोगशाळेकडून काही चाचणी अहवाल सदोष निष्कर्ष काढले गेल्याचे प्रकरण मध्यंतरी मुंबई आणि नवी मुंबईत उघडकीस आले होते.

नेमके झाले काय?

ठाण्यातील एका खासगी प्रयोगशाळेत १५ मे रोजी ४४ करोना संशयीतांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १२ रुग्णांचे अहवाल होकारात्मक असल्याचा निष्कर्ष या प्रयोगशाळेने काढला. यापैकी काही रुग्णांना कोणतेही लक्षण नव्हते. तसेच टाळेबंदीच्या काळात आपण साथसोवळ्याची पुरेपूर काळजी घेतल्याचाही या रुग्णांचा दावा होता. त्यानुसार प्रशासनाने या रुग्णांची महापालिका प्रयोगशाळेत फेरतपासणी केली. यापैकी पाच जणांचा अहवाल नकारात्मक आल्यामुळे आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित प्रयोगशाळेस तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गरज नसताना चाचणी..

ज्या रुग्णांना कोविडची लक्षणे आहेत अशांची चाचणी करावी असे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच नोंदणीकृत वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच ही तपासणी करायची आहे, असे असताना कोविडची कोणतीही लक्षणे नसलेली आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही नसलेल्या अनेक रुग्णांची चाचणी ठाण्यातील प्रयोगशाळेत करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेकांचे अहवाल यापुर्वीही होकारात्मक आले असून अशांना खासगी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्षणे तसेच वैद्यकीय सल्ला नसताना केलेल्या चाचण्या आणि त्यानंतर आलेल्या अहवालानंतर या रुग्णांची करण्यात आलेली खासगी कोविड रुग्णालयातील रवानगी या प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या तक्रारी ठाणे पालिकेकडे आल्या आहेत. सदोष अहवालांचे निष्कर्ष, संबंधित रुग्ण आणि ते दाखल झालेले खासगी कोविड रुग्णालयाच्या साखळीचा अभ्यास केला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

शहरातील एका खासगी प्रयोगशाळेतील काही करोना अहवाल सदोष असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रयोगशाळेने ‘आयसीएमआर’ने आखून दिलेल्या नियमांचेही पालन केलेले नाही. या प्रयोगशाळेला नोटीस बजाविण्यात आली असून गरजू रुग्णांच्या टेस्टिग किट्स आणि कोव्हिड केअर खाटांचा होत असलेल्या अपव्यवाचा मुद्दाही अधोरेखीत करण्यात आला आहे.

– संदीप माळवी, उपायुक्त ठाणे महापालिका