29 September 2020

News Flash

स्वच्छतेचा ‘कचरा’ केल्याचा फटका

जानेवारी महिन्यात देशभर स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. यात राज्यातील ४४ शहरे सहभागी झाली होती.

स्वच्छता सर्वेक्षणात मीरा-भाईंदर पिछाडीवर; देशभरातील शहरांमध्ये १३०वा क्रमांक

केंद्र सरकारच्या वतीने देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेने राज्यातील महानगरपालिकांमध्ये नववा क्रमांक पटकावला असला तरी देशभरातील शहरांमध्ये मीरा-भाईंदरचा क्रमांक १३०वा आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नसणे आणि त्यावर प्रक्रिया नसणे, शहर हागणदारीमुक्त नसणे या मुद्दय़ावर मीरा-भाईंदरचा क्रमांक खाली घसरला.

जानेवारी महिन्यात देशभर स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. यात राज्यातील ४४ शहरे सहभागी झाली होती. केंद्र सरकारने नेमलेल्या ‘क्वालिटी काऊंन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेचे सदस्य सर्वेक्षणासाठी मीरा-भाईंदरमध्ये आले होते. ६ ते ८ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण पार पडले. शहरातील वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, रहिवासी सोसायटय़ांची स्वच्छता तसेच कचराकुंडय़ा या मुद्दय़ावर हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

त्या वेळी सर्वेक्षणादरम्यान ऑनलाइन होत असलेल्या गुणांकनात संपूर्ण राज्यात मीरा-भाईंदरची पाचव्या स्थानावर घोडदौड सुरू होती. परंतु समितीने पाहणी केलेल्या मुद्दय़ांव्यतिरिक्त अन्य बाबतीत महापालिका मागे पडल्याने राज्यातील महापालिकेत तिचा नववा क्रमांक आला आहे, तसेच राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या गुणांकनात मीरा-भाईंदरचा क्रमांक अकरावा ठरला आहे.

मीरा-भाईंदर मागे का?

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचे समितीच्या सदस्यांच्या नजरेत आल्याने महापालिकेची गुणांकनात घसरण झाली.

घनकचरा हाताळणी नियमानुसार कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे ही बाबही सर्वेक्षण समितीकडून तपासण्यात आली. मात्र शहरातील कचरा एकत्रित उचलला जात असल्याने त्यासाठी महापालिकेला गुण मिळाले नाहीत.

शहर हागणदारीमुक्त ठेवणे ही बाबही सर्वेक्षणाच्या गुणांसाठी महत्त्वपूर्ण धरण्यात आली. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही मीरा-भाईंदर शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेले नाही. आजही अनेक झोपडपट्टी परिसरातील रहिवासी उघडय़ावरच शौचाला जात असतात. त्याचाही फटका शहराला बसला आहे.

भुयारी गटार योजना पूर्ण झाली नसल्याची बाबही अधिक गुण मिळविण्यास मारक ठरली आहे.

काही बाबतीत सरस

शहरातील प्रभागांची साफसफाई, शहर कचराकुंडी मुक्त असणे, जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालये बांधून घेणे आदी बाबीमध्ये सरस ठरल्याने मीरा-भाईंदरने राज्यात पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला आहे. या महिन्यापासून मीरा-भाईंदर महापालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली आहे आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही लवकरच सुरू होणार आहे, तसेच मे महिन्याअखेर शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भुयारी गटार योजनेचे कामही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या सर्वेक्षणात मीरा-भाईंदरचा क्रमांक राज्यात पहिल्या पाचमध्ये येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:26 am

Web Title: swachh bharat rankings 2017 mira bhayandar corporation
Next Stories
1 विरार स्थानकातील नव्या पुलावर प्रवाशांचा भार
2 मांसविक्रीसाठी अधिकारीच जबाबदार
3 भिवंडीतील चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग
Just Now!
X