कल्याण-डोंबिवलीचा देशात २३४वा क्रमांक;  ठाण्यालाही पहिल्या १००मध्ये स्थान नाही

केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयाने देशभरातील शहरांतील स्वच्छतेबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली या शहरांच्या अस्वच्छतेचे पितळ उघडे पडले आहे. एकीकडे स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने देशात पहिल्या दहा शहरांच्या यादीत स्थान मिळवले असताना कल्याण डोंबिवलीला २३४वा क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छतेच्या आघाडीवर ठोस कामगिरी करणाऱ्या ठाण्याला पहिल्या शंभरातही स्थान मिळवता आलेले नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ही महत्त्वाची शहरे पिछाडीवर असताना अंबरनाथ शहराने मात्र देशात ८० वा क्रमांक पटकावला आहे.

स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकारने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात ७५ शहरांमध्ये कल्याण डोंबिवली ही शहरे ६४व्या स्थानी होती. यावरून नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर शहरातील स्वच्छतेबाबत पालिका प्रशासन तातडीने पावले उचलेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेले वर्षभर या आघाडीवर ठोस काहीही करता न आल्याने यंदा ५०० शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवली महापालिका २३४व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. ‘स्वच्छतेबाबत पाऊल उचलूनही कल्याण डोंबिवली पिछाडीवर राहणे, ही बाब चिंताजनक आहे. याच्या कारणांचा आढावा घेण्यात येईल,’ अशी प्रतिक्रिया महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

दरम्यान, देशस्तरावरील स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचीही पीछेहाट झाल्याचे दिसून आले. गतवर्षी ७५ शहरांच्या यादीत १६व्या क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा ११६वे स्थान मिळाले आहे. महापालिकेची स्वत:ची कचराभूमी नसणे, दिव्यातील खाडीकिनारी कचरा टाकण्याची पद्धत, मुंब्य्रासारख्या भागात सदोष कचरा एकत्रीकरण अशा कारणांमुळे ठाणे शहर पहिल्या शंभरात स्थान मिळवू न शकल्याची टीका होत आहे.

परिस्थिती सुधारत असल्याचा दावा

कल्याण डोंबिवलीचा देशात २३४वा क्रमांक आला असला तरी स्वच्छतेचे चित्र सुधारत असल्याचा दावा पालिका अधिकारी करत आहेत. ‘केंद्र सरकारचे प्रतिनिधी डिसेंबर २०१६ मध्ये सर्वेक्षणासाठी आले होते. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेने आखलेले अनेक प्रकल्प हे कागदावर होते, पुढे सरकलेले नव्हते. त्यावेळी उघडय़ावर टाकला गेलेला कचरा यामुळे आपले अनेक गुण कापले गेले असतील,’ असे मत पालिकेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. येत्या जून महिन्यात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे दोन बायोगॅस प्रकल्प सुरू होत आहेत. उंबर्डेचा घनकचरा विल्हेवाट प्रकल्प डिसेंबर २०१७ मध्ये सुरू होईल. तसेच घंटागाडय़ा असून चालकांची कमतरता होती. मात्र खाजगी ठेकेदारांकडून ५० चालक घेतले आहेत, १६ गाडय़ा आल्या असून आणखी १६ येणार आहेत. यामुळे स्टेशन परिसर आता कचरामुक्त झाला आहे. हे सर्व आपल्याला पुढच्यावर्षीच्या निकालात दिसून येईल, असा दावा या अधिकाऱ्याने केला.