|| भगवान मंडलिक

स्वामी विवेकानंद शाळा, डोंबिवली

मुंबईत नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना परवडणाऱ्या घरांसाठी पाच-सहा दशकांपूर्वी डोंबिवलीला पसंती दिली. विविध प्रांतांमधून आलेले रहिवासी या शहरात स्थिरावले. कल्याण व्यापारी, बाजारपेठेचे ठिकाण. डोंबिवली नोकरदारांची वस्ती, अशी वर्गवारी त्या वेळी होती. या शहरांमधील मुलांची शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी डोंबिवलीत स. वा. जोशी, टिळकनगर विद्यालय, ध. ना. चौधरी ही विद्यालये होती. मात्र अजून शाळांची आवश्यकता होती. तेव्हा येथील नवमध्यमवर्गाची गरज लक्षात घेऊन मनोहर गोविंद ऊर्फ बाबा मोकाशी यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांतील माणूस घडविणारी, बालपणापासून राष्ट्रप्रेमाचे संस्कार देणारी वेगळ्या धाटणीची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. चार विद्यार्थ्यांना हाताशी धरून बाबासाहेबांनी स्वत:च्या घरात शाळेची मुहूर्तमेढ रोवली. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली.

बाबासाहेबांच्या शैक्षणिक उपक्रमाला पालकांचा पाठिंबा मिळू लागला. शहरातील जाणती मंडळी डॉ. दत्तात्रय मुनशी, अण्णा नाबर, अंतुरकर, रेंगेसर बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात सहभागी झाले. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढू लागली. वर्ग वाढले. १९७०-८० च्या दशकानंतर डोंबिवलीचे नागरीकरण होऊ लागले. विस्तारित भागातील मुलांची शिक्षणाची गरज भागविण्यासाठी त्या भागात शाळा सुरू कराव्यात, हा विचार करून डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगरमध्ये राणाप्रताप भवन, महात्मा फुले रस्त्यावर अरुणोदय, पूर्वेत गोपाळनगर आणि रामचंद्रनगर भागात शाळा सुरू करण्यात आल्या. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळा नावाने हा वटवृक्ष नावारूपाला आला. ‘शाळा हे कुटुंब आणि विद्यार्थी ही मुले या कोमल भावनेतून शाळाचालकांनी संस्थेचा वटवृक्ष फुलविला. नि:स्वार्थी भावनेतून, मानधनाची अपेक्षा न बाळगता संस्थाचालक शाळेचा गाडा हाकत आहेत. संस्थेच्या सहा पूर्व प्राथमिक, सात प्राथमिक, पाच माध्यमिक आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. १० हजार विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत. विविध क्षेत्रातील व्यासंगी संचालक काम करतात.

शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जेव्हा मुंबईतील पार्ले टिळक, बालमोहनसारख्या शाळा आघाडीवर होत्या. त्या वेळी स्वामी शाळेचे विद्यार्थी त्या यादीत तेवढय़ाच गुणवत्तेने झळकत होते. तीच गुणवत्ता तेवढय़ाच समर्थपणे, त्यापेक्षा काही पटीने शाळेने टिकवून ठेवली आहे. इंग्रजी माध्यमाचा सगळीकडे बोलबाला असताना स्वामी शाळेने गेल्या दोन वर्षांत ‘मिशन मराठी’ उपक्रम राबवून इंग्रजी माध्यमाकडे ओढल्या जाणाऱ्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. संस्थेच्या ५० वर्षांत प्रथमच एक महिला शाळेची अध्यक्षा झाली. शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुलभा डोंगरे या शिक्षिकेला संस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले. भविष्याचा वेध घेऊन उपक्रम राबविणारे कार्यवाह संजय कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अ‍ॅड. संजय हिंगे, अरविंद मुजूमदार ही व्यवस्थापन समिती समत्वबुद्धीने ज्ञानगंगेचा प्रवाह प्रगतीकडे नेत आहे.

दुर्गम भागात आश्रमशाळा

दुर्गम खेडय़ातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून संस्थेने कसाराच्या डोंगर घाटातील चिंध्याची वाडी येथे आश्रमशाळा सुरू केली. सुरुवातीला आश्रमशाळेत विद्यार्थी मिळविण्यासाठी संस्थाचालकांनी परिसरातील वाडय़ा-पाडय़ांची पायपीट केली. शिक्षणाचे महत्त्व पटू लागल्याने आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आता उडय़ा पडत आहेत.

रात्रशाळेतही ८०० विद्यार्थी

घरगुती परिस्थितीने गांजलेले अनेक विद्यार्थी दिवसा नोकरी, रात्रीच्या वेळेत शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. अशा विद्यार्थ्यांच्या दोलायमान परिस्थितीचा विचार करून संस्थेने रात्र महाविद्यालय सुरू केले. ८०० विद्यार्थी या महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. बाहय़ शिक्षण स्पर्धेत शाळा एक अंशही कमी राहू नये म्हणून संस्थेत अर्ध मराठी-इंग्रजी, इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले.