‘पोहणे’ म्हणजे नुसते पाण्यात डुंबणे नव्हे तर ती एक कला आहे. पोहण्याचीही एक पद्धत असून पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. शरीरासाठी पोहणे हा एक उत्कृष्ट व्यायामप्रकार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेतून साहाय्यक कार्य व्यवस्थापक (असिस्टंट वर्क्‍स मॅनेजर) म्हणून निवृत्त झालेले हरिश्चंद्र कृष्णाजी कोकणे यांनी निवृत्तीनंतर पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा वसा घेतला. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आजवर त्यांनी साडेपाच हजार जणांना ‘पोहणे’ शिकविले आहे. पोहणे शिकविण्याबरोबरच सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी कल्याणकारी सभा, बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि इतरही काही संस्थांमधून कोकणे यांचे काम सुरूआहे. वयाच्या ७६ व्या वर्षांतही त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजविणारा आणि त्यांच्या समवयस्कांना काहीतरी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.

कोकणे हे मुळचे रायगड जिल्ह्य़ातील तळा-घोसाळे गावचे. त्यांचे शालेय शिक्षण भुसावळ येथे तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत रुपारेल महाविद्यालयात झाले. १९५८ मध्ये मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेत ते ‘अ‍ॅप्रेंटिस मेकॅनिक’ म्हणून नोकरीला लागले. पुढे ‘क्लास टू गॅझेटेड’ ऑफिसर व नंतर ‘असिस्टंट वर्क्‍स मॅनेजर’ या पदावरून २००० मध्ये निवृत्त झाले. कोकणे यांना लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. ती त्यांनी रेल्वेत नोकरीला लागल्यानंतरही जोपासली. नोकरीत सुरुवातीच्या काळात त्यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर महासंघाचेही काम केले. पुढे बढती मिळाल्यानंतर काम थांबविले. महाविद्यालयात असताना मुंबई विद्यापीठाचे तसेच नोकरीच्या कालावधीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील जलतरणाच्या विविध स्पर्धामधून त्यांनी रेल्वेचे प्रतिनिधित्व केले आणि सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिके मिळवून दिली. गेली २४ वर्षे त्यांनी रेल्वेसाठी राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदविला. सूर मारणे (डायव्हिंग हायबोर्ड) या प्रकारात ते तरबेज होते. रेल्वेच्या आंतरविभागीय जलतरण स्पर्धासाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिले. ‘स्लिमिंग फेडरेशन ऑफ इंडिया’च्या समितीवर परीक्षक म्हणूनही ते आहेत. नोकरीच्या कालावधीत गोविंद सदारंगानी, साठे गुरुजी, अनिल वैद्य यांच्याकडून कोकणे यांनी जलतरणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्याचा त्यांना पुढे खूप फायदा झाला. ‘स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग’ आणि ‘हायबोर्ड डायव्हिंग’ या जलतरण प्रकारात ते तरबेज झाले. निवृत्तीनंतर कोकणे अंबरनाथ येथे राहायला आले. इकडे आल्यानंतरही पोहण्याची आवड स्वत:पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी जलतरण कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या परिसरातील लोकांना द्यायचे ठरविले.

कल्याण ते बदलापूर परिसरातील विविध जलतरण तलावांची त्यांनी पाहणी केली. या परिसरातील विद्यार्थ्यांना किंवा मोठय़ांनाही जलतरणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही, ही खंत त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा लोकांना देण्याचे ठरविले. या परिसरातील विद्यार्थी आणि मोठय़ा मंडळींनाही त्यांनी पोहणे शिकवायला सुरुवात केली. चार ते पाच वर्षांच्या बालकांपासून ते ७० वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक त्यांचे विद्यार्थी झाले. जलतरण तलावांवर प्रशिक्षक म्हणून काम करताना सशुल्क तर ज्यांना खरोखरच पोहणे शिकायचे आहे पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा काही जणांना त्यांनी कोणतेही मानधन न घेताही शिकविले. त्यांनी शिकविलेल्या पृथीपाल सिंह या महाविद्यालयीन तरुणाने जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. पी. कुलकर्णी यांच्यासह डॉक्टर, उद्योजक आणि अन्य विविध क्षेत्रांतील मंडळींना कोकणे यांनी पोहणे शिकविले आहे. बडोदा, मुंबई, जबलपूर येथील रेल्वे प्रशिक्षण केंद्रातही त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा करून दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता पोहणे शिकविले आहे. आपल्याकडून या मुलांना आपण पोहणे शिकविले याचा त्यांना खूप आनंद व समाधान आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांनी दररोज किमान अर्धा तास तरी पोहण्यासाठी द्यावा, असे कोकणे यांचे सांगणे आहे. शाळा आणि महाविद्यालयात पोहणे आणि मैदानी खेळ हे विषय सक्तीचे करावेत, असेही ते सांगतात. स्वत: कोकणे या वयातही दररोज जलतरण प्रकारातील ‘फ्री स्टाईल’, ‘बॅक स्ट्रोक’, ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ आणि ‘बटर फ्लाय’ हे प्रकार करतात. कोकणे यांच्या ‘पोहणे’ शिकविण्याच्या कामाची दखल अंबरनाथ ब्राह्मण सभेने घेवुन त्यांचा खास गौरव केला आहे.

पोहणे शिकवण्याबरोबरच कोकणे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. रेल्वेतून निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी या संघटनेचे ते सदस्य आहेत. निवृत्त झालेल्यांना भेडसाविणारे प्रश्न, निवृत्ती वेतन मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम ही संघटना करते. जे निवृत्त कर्मचारी संघटनेचे सभासद नाहीत, त्यांचेही काही प्रश्न असतील तर ते आम्ही सोडवितो, असे कोकणे यांनी सांगितले. रेल्वे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना रेल्वेकडून प्रवासी पास मिळतो. हा पास घेण्यासाठी या निवृत्त कर्मचाऱ्यांना मुंबईला जावे लागत होते. कोकणे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थकांपर्यंत निवेदने आणि पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आणि हा पास अंबरनाथ रेल्वे स्थानकात मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांचा पास घेण्यासाठी मुंबईपर्यंतचा जाण्याचा त्रास वाचला. आता ही सोय अंबरनाथऐवजी कल्याण येथे उपलब्ध आहे.

नाटककार आणि अभिनेते बाळ कोल्हटकर हे अंबरनाथ येथे राहात होते. त्यांची स्मृती जपण्यासाठी बाळ कोल्हटकर ज्येष्ठ नागरिक कट्टा अंबरनाथ येथे कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम या कट्टय़ातर्फे आयोजित केले जातात. या सगळ्या कामात आमदार डॉ. बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे सहकार्य मिळते. या सगळ्या कामात कोकणे यांना त्यांची पत्नी वसुधा, दोन विवाहित कन्या, जावई यांचा पाठिंबा असतो. त्यांच्या पठिंब्यामुळेच मी हे काम करू शकतो, असेही कोकणे आवर्जून सांगतात. निवृत्तीनंतर प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या सामाजिक कामात गुंतवून घ्यावे, आवडीचा एखादा छंद जोपासावा. रिकामे बसू नये. स्वत:च्या कुटुंबाकडे पाहताना इतरांनाही जमेल तेवढी मदत करावी, असेही कोकणे यांचे आवर्जून सांगणे आहे.