वसई-विरारमध्ये एका आठवडय़ात तिघांचे बळी, १२ जणांना लागण झाल्याची नोंदखास

वसई-विरार शहरात स्वाइन फ्लू आजाराची साथ पसरली असून एका आठवडय़ात तीन जणांना मृत्यू या आजाराने झाला आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. या आजाराचे रुग्ण वाढू नये आणि रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असून पालिका रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.

जीवघेण्या स्वाइन फ्लूचा आजार आता वसई-विरार शहरात मोठय़ा वेगाने पसरू लागला आहे. माणिकपूर येथील शिक्षिका लोपीस यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, त्यांच्यासह आणखी दोघांचाही या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती पालिकेने दिली. शहरातील विविध रुग्णालयांत १२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे पालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रमेश प्रजापती यांनी सांगितले. रुग्णालयांत उपचारासांसाठी दाखल असलेल्या संशयित रुग्णांची सखोल तपासणी करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. ‘‘आम्ही लागण झालेल्या रुग्णांच्या घर आणि परिसरात तसेच त्यांच्या नातेवाईकांचीही तपासणी करत आहोत. हा संसर्गजन्य आजार असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनाही त्याची लागण होऊ शकते. सर्दी आणि तापाने स्वाईन फ्लूची सुरुवात होते. त्यामुळे रुग्णांनी गाफील राहू नये. सर्दी किंवा ताप आल्यास अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना दाखवून उपचार करावे,’’  असे डॉ. प्रजापती यांनी सांगितले. स्वाइन फ्लूच्या आजारावरील सर्व औषधी आणि लसींचा पुरेसा साठा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूची लक्षणे

  • स्वाइन फ्लूची लक्षणे साध्या तापासारखीच असतात. थंडी वाजणे, १०० अंश फॅ. पेक्षा जास्त आदी लक्षणे आढळतात.
  • सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
  • तापाची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ आगोदर दिसतात, तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरूपाची असतात.
  • ताप आल्यानंतर दोन ते तीन आठवडे सतत अशक्तपणा येतो, तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते. डोकेदुखी व घसादुखी होते.

महापालिकेकडून उपाययोजना

  • स्वाइन फ्लू होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, हा आजार कसा रोखावा, त्याची लक्षणे काय? याची माहिती असलेली पत्रके महापालिकेकडून शहरातील नागरिकांना वाटण्यात येत आहे.
  • स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी पालिका रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आला आहे.

ठाणे, नवी मुंबईतही बाधा

ठाणे आणि नवी मुंबई शहरांमध्येही स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्याचे आढळले असून मंगळवारी अवघ्या एका दिवसात २१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये तीन जणांचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. पनवेलमध्ये विविध रुग्णालयांत आठ रुग्ण उपचार घेत असून एकूण १९ संशयित रुग्ण आढळले आहेत.