तीन वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र

कुळगाव-बदलापूर व अंबरनाथ नगरपालिकांच्या यंदाच्या एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये जमा-खर्च सादर न केल्याबद्दल बदलापूरच्या दोन व अंबरनाथच्या अठरा उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.

ठाण्याच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरलेल्यांची ही वीस नावे घोषित केली आहेत. त्यामुळे निवडणुकीचा जमा-खर्च सादर नाही केला तर, काय फरक पडतो असा आडमुठा विचार करणाऱ्यांना ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.

एप्रिल २०१५ मध्ये बदलापूर आणि अंबरनाथ पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीसाठी केलेल्या जमाखर्चाचा तपशील, संपूर्ण संक्षिप्त खर्च शपथपत्रासह निवडणूक झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते.

मात्र बदलापूरच्या दोन आणि अंबरनाथच्या अठरा उमेदवारांनी आपला जमाखर्च विहित मुदतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर न केल्याबद्दल महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्य्ोगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १६(१ड) अन्वये या सर्व वीस उमेदवारांना १४ सप्टेंबर २०१५ पासून तीन वर्षे पालिका निवडणूक लढवण्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी केली आहे. तसे लेखी पत्र प्रत्येक उमेदवारांना पाठवण्यात आले आहे. या वीस उमेदवारांमध्ये एकही विजयी उमेदवार नाही.

मात्र बदलापूर पश्चिमेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष उमेश तायडे आणि प्रसाद सूर्यकांत वळंजू यांचा समावेश आहे. अंबरनाथमधील साईनाथ गुंजाळ, सुनिता गुप्ता, अनिल माळी, शेख गयाउद्दीन रहीम, सय्यद शौकत रहीम, कचरला नरेन्द्राव व्यंकटराव, खान युसूफ लिदन, नकवाल परशुराम अनिल, शेख हसीना कमरुद्दीन, सासे नीलम वासुदेव, गारुंगे देविका भूषण, शेख मोहमद फारूक गुलामपीर, आरसन कार्तिक पेरूमल, मकन जोसेफ लिव्हिस्तीम, सुवर्णा कमलाकांत बनसोडे, भोईर सूर्यकांत विठू, भोईर जयश्री अनिल आणि गुंजाळ हिरालाल नामदेव यांना जिल्हाधिकारी जोशी यांनी अपात्र घोषित केले असून या वीस जणांना पुढील तीन वर्षे पालिकेची निवडणूक लढविता येणार नाही.