पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश

ठाणे : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना दिले. फेरीवाल्यांना आखून दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर येथील कासारवडवली बाजारपेठेत ठाणे महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर अमरजीत यादव या फेरीवाल्याने सुऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची तीन बोटे आणि अंगरक्षकाचे एक बोट छाटले गेले. दरम्यान, मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी िपपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे केलेला हल्ला खपवून घेणार नसून या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना दिले आहेत. शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले. फेरीवाल्यांना आखून दिलेल्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले.