कल्याणमधील रिक्षाचालकांची मनमानी मोडून काढण्यासाठी येथील नागरिकांनी बस, खासगी वाहनाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मागणी बरोबरच नागरिकांनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर रस्ते अडवून, रिक्षा वाहनतळ सोडून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वलीपीर रस्त्यावरील साधना हॉटेल ते दीपक हॉटेल यादरम्यान अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळावर उभे न राहता मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या करून व्यवसाय करतात. चालकांच्या या मनमानीमुळे रेल्वे स्थानक भागात सकाळी ते रात्री उशीरापर्यंत सतत वाहतूक कोंडी होते. या भागात वाहतूक पोलिसांचे संचलन सुरू असते. एकही वाहतूक पोलिस रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करीत नाही.
रेल्वे स्थानक भागाला पडलेला बेकायदा वाहनांचा विळखा स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस यांनी एकत्रित कारवाई करून सोडवावा. वाहनतळ सोडून रिक्षा व्यवसाय केल्याने लांबचे व मोठय़ा रकमेचे भाडे मिळते. या चालकांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसाय मात्र नाहक बदनाम होतो, असे नियमित व्यवसाय करणाऱ्या चालकांनी सांगितले.