राखणदारीसाठी श्वानांचे पालन होत असताना कालांतराने घरात प्रतिष्ठेसाठी, शोभेसाठी एखादा श्वान असावा या उद्देशाने श्वान पालन होऊ लागले. केवळ या श्वानांचे सौंदर्य, काही खास वैशिष्टय़े यामुळे श्वानप्रेमींनी या श्वानांचे पालन करण्यास सुरुवात केली. अशाच प्रकारात मोडणारे एक श्वान म्हणजे शित्झू. चीन देशात मंदिराबाहेर सिंहाच्या चेहऱ्याशी साधम्र्य साधणारी मूर्ती ठेवण्यात येते. या मूर्तीसारखेच भासणारे शित्झू श्वान आपल्या गोंडस आणि रूपवान चेहऱ्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. चीनमध्ये शित्झू श्वानांना ‘चायनीज लायन डॉग’ असेही म्हणतात. मूळचे तिबेटमधील असलेल्या शित्झू श्वानांना चीन देशात आल्यावर मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. अठराव्या शतकापासून शित्झू श्वान अस्तित्वात आहेत, असे श्वानतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मात्र १९३० पर्यंत चीन देशाने शित्झू श्वानांच्या चीनमधील लोकप्रियतेमुळे या श्वानांना बाहेरील देशात पाठवण्यास बंदी घातली होती. १९३० साली प्रथमच शित्झू श्वानांना इंग्लंडमध्ये नेल्यावर जगभरात या श्वानांचा प्रसार झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर सैनिकांनी युरोपमध्ये परतताना शित्झू श्वानांना अमेरिकेत नेले. कालांतराने ब्रिटिशांनी हे श्वान आपल्यासोबत भारतात आणले.
संपूर्ण शरीरावर असणारे लांब केस, लहान शरीरयष्टी यामुळे रूपवान असलेले शित्झू श्वानप्रेमींना आकर्षित करतात. मुख्य रंग पांढरा आणि त्यावर तपकिरी, काळा, सोनेरी रंगाचा काही भाग या श्वानांच्या शरीरावर आढळतो. सुंदर दिसणे हेच या श्वानांचे वैशिष्टय़ असल्याने हे श्वान ब्रीड अधिक पसंतीस पडते. लहान आकारात असलेले शित्झू टॉय ब्रीड प्रकारात मोडतात. आकाराने लहान असल्याने घराची राखण करण्यासाठी उपयुक्त नाहीत. घरात शोभेसाठी, प्रतिष्ठेसाठी या श्वानांचे पालन केले जाते. विविध डॉग शोजमध्ये शित्झू श्वानांचे सुंदर दिसणे यामुळेच हे श्वान उत्कृष्ट ठरतात.
दाट केस आणि लांब कान यामुळे कानामध्ये हवा जात नाही. मात्र पुरेशी हवा उपलब्ध होत नसल्याने कानात संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी दोन्ही कान डोक्याच्या वर बो बांधून ठेवावे लागते. थोडय़ा वेळासाठी कानांमध्ये हवा गेल्यास या श्वानांना थंडावा मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने श्वानमालकाला काळजी घ्यावी लागते. केसांच्या वाढीसाठी डॉग फूड दिले जाते. पस्तीस ते चाळीस हजारांपासून या श्वानांच्या किमती आहेत. एकंदरीतच आकाराने लहान, दिसायला रूपवान असले तरी शित्झू श्वानांचे पालन करताना मालकाला जास्त काळजी घ्यावी लागते.
हायपो थायरॉईडची शक्यता
शित्झू श्वान मध्यम वयाचे झाल्यावर या श्वानांना हायपो थायरॉईड हा आजार होण्याची शक्यता असते. यासाठी शित्झू श्वानांना नियमित व्यायाम आणि समतोल आहाराची आवश्यकता असते. नियमित शारीरिक तपासणी या श्वानांची करावी लागते. बंदिस्त जागेत न ठेवता कोणत्याही श्वानांना बाहेरील मोकळी हवा सुदृढ राहण्यासाठी उपयोगी ठरते. तसेच श्वासोच्छ्वासाची समस्या या श्वानांना जाणवते. शित्झू श्वानांची नाक आणि डोक्याची रचना गुंतागुंतीची असल्याने या श्वानांच्या नाक आणि छातीत कफ साचून राहण्याचा संभव असतो. यामुळे धूळ, कचरा यापासून या श्वानांचा बचाव करावा लागतो. श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे बहुतांश विमान कंपन्यांनी शित्झू श्वानांना प्रवासासाठी बंदी केली आहे. जमिनीपासून या श्वानांची उंची कमी असल्याने उष्णतेचा त्रास या श्वानांना अधिक संभवतो. डोळे मोठे असल्याने धूळ डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांतून पाणी येण्याचा त्रास या श्वानांना होतो.

नियमित ग्रुमिंगची आवश्यकता
शित्झू श्वानांच्या डोळ्यांपासून शेपटीपर्यंत संपूर्णत: लांब केस असल्याने या श्वानांना नियमित ग्रुमिंगची आवश्यकता असते. शरीरावरील संपूर्ण केस कंगव्याने विंचरले जाणे आवश्यक असते. प्रत्येक केस वेगळा ठेवावा लागतो. दररोज या श्वानांच्या केसांवरून हात फिरवणे गरजेचे असते. केसांमध्ये गुंता झाल्यास या श्वानांना त्रास होण्याची आवश्यकता असते. केस दाट असल्यामुळे या श्वानांच्या शरीरावर पुरळ आल्यास निदर्शनास येत नाही. यासाठी नियमित ग्रुमिंग महत्त्वाचे ठरते.