वसई-विरारच्या आयुक्तांचा निर्धार; २० हजार फेरीवाल्यांचे ४१ बाजारपेठांमध्ये स्थलांतर

वसई-विरार शहरात यापुढे एकही फेरीवाला रस्ता अडवलेला दिसणार नाही. शहरातील सर्व फेरीवाल्यांना विविध ४१ बाजारपेठांमध्ये स्थलांतरित केले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर आयुक्त सतीश लोखंडे यांनी शुक्रवारी ‘फेरीवाला हटाव’ मोहिमेचा निर्धार केला. फेरीवाल्यांचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही आणि जर त्यांनी विरोध केला तर त्यांना पोलीस बळाचा वापर करून हटवले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

वसई-विरार शहरात जागोजागी फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपापली दुकाने थाटली आहे. अनेक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. अगदी पालिका मुख्यालयाच्या रस्त्यावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी सर्व फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. यामुळे संतापलेल्या सर्व फेरीवाल्यांच्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी वसई-विरार फेरीवाला संघ स्थापन केला. शुक्रवारी त्यांनी पालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयावर धरणे आंदोलने केली होती. आयुक्तांनी मात्र ठाम भूमिका घेत रस्त्यावर एकही फेरीवाला ठेवणार नसल्याचे सांगितले. पालिकेने नऊ प्रभागांत ४७ बाजारपेठा बांधल्या आहेत. त्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व फेरीवाल्यांचे सव्‍‌र्हेक्षण पूर्ण झाले असून त्यांना या बाजारपेठांमध्ये स्थलांतरित व्हावे लागणार आहे.

शहरात २० हजार फेरीवाले

वसई-विरार शहरातील सर्व फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्येक फेरीवाल्याच्या अंगठय़ाचे ठसे घेण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात एकूण २० हजार फेरीवाले आहेत. त्यातील भौगोलिक स्थानाच्या चाचणीनंतर अनेक फेरीवाले बाद होणार आहेत. याबाबत बोलताना सहप्रकल्प अधिकारी संजय हिनवार यांनी सांगितले की, बायोमेट्रिक सर्वेक्षणात ज्यांनी दोनदा नावे दिली आहेत, तसेच एका घरातून दोन नोंदणी असतील असे किमान पाच हजार फेरीवाले बाद होणार आहेत. स्थलांतरासाठी पथविक्रेता समिती स्थापन केली जाणार असून त्यात आयुक्त, फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी, पोलीस, अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

राज्यात फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सव्‍‌र्हेक्षण करणारी वसई-विरार ही एकमेव महापालिका आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार बाजारपेठांमध्ये त्यांना हलविले जाणार आहे. फेरीवाले जास्त झाले तर नवीन बाजारपेठ उभारली जाईल, पण एकही फेरीवाला रस्त्यात राहू देणार नाही.

– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका