मुंब्रा येथे कारवाई सुरूच; राष्ट्रवादीच्या बडय़ा पदाधिकाऱ्याचे हॉटेलही उद्ध्वस्त

ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी शहरातील आणखी ७५० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईला कोणीही विरोध दर्शवला नाही. मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या एका बडय़ा पदाधिकाऱ्याचे हॉटेलही या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले.

मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसाच्या वाय जंक्शनपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. या रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात १४०० बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. उर्वरित बांधकामे पाडण्याची कारवाई पालिकेने दुसऱ्या दिवशी सुरूच ठेवण्याच निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. सलग दोन दिवस सुरू असलेल्या कारवाईमुळे मुंब्य्रात रस्त्यालगत बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुरुवारी दिवसभरात जवळपास ७५० बेकायदा बांधकामांवर हातोडा मारण्यात आला असून ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मुंब्रा बाजारपेठ, कौसा मार्केट, रशिद कंपाऊंड, अमृतनगर या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या भागातील दुमजली व्यावसायिक इमारतींसह बहुमजली इमारतीही पाडण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी करून कारवाई अधिक वेगाने करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. पोलीस उपायुक्त सचिन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत सात पथकांच्या साहाय्याने मोठय़ा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.