News Flash

तंदुरीची लज्जत!

चिकन तंदुरी.. मांसाहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ.

चिकन तंदुरी.. मांसाहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ. रस्त्यावरून जाता जाता कुठे एखाद्या कोपऱ्यावरच्या तंदुरी कॉर्नरच्या बाहेर लावलेल्या भट्टीतून दरवळत येणारा चिकन तंदुरीचा वास पोटभर जेवलेल्या खवय्यांनाही भूक लावतो. भट्टीत शिजणाऱ्या तंदूरच्या वासावरूनच त्याच्या चवीचा अंदाज बांधता येतो, इतकं कौशल्य अनेकांनी साधलेलं असतं. विविध प्रकारचे मसाले लावून भट्टीच्या आगीत व्यवस्थितपणे भाजून निघालेलं चिकन जेव्हा चिरलेला कांदा, लिंबू आणि चटणीसोबत प्लेटमध्ये येतं, तेव्हा त्याच्यावर अक्षरश: उडय़ा पडतात. अशा वेळी आजूबाजूला कुणी पाहतंय, याची तमा न बाळगता चिकनवर आडवातिडवा हात मारला जातो, तो अगदी प्लेट रिकामी होईपर्यंत थांबत नाही. थोडक्यात चिकन तंदुरी ही एक अशी ‘डिश’ आहे जी स्टार्टरपासून मेनकोर्सपर्यंत कोणत्याही टप्प्यावर खायला खवय्यांची ना नसते. अशाच खवय्यांची गर्दी असलेला एक तंदुरी कट्टा ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे आहे. त्याचे नावच मुळी तंदूर कट्टा आहे. येथील चविष्ट तंदूर खाण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच खवय्यांचा येथे सारखा राबता असतो.

मुळातच तंदुरी म्हटले की चिकन तंदुरी हा पदार्थ लगेचच डोळ्यासमोर येतो. हळद, तिखट, मीठ आदी जिन्नस एकत्र करून मसाला लावलेले चिकन पाहिले की खवय्यांना धीर धरवत नाही. एखाद्या अस्सल रसिकाने गायकाने घेतलेल्या हरकतीच्या जागेला वन्स मोअरची दाद द्यावी, तशी दादही अनेक खवय्ये तंदुरी चिकनला देतात. चिकन तंदुरीत मुंबईतील ‘बडे मियाँ’चे नाव आहे. ठाण्यातील या तंदुरी कट्टय़ामुळे खवय्यांना बडे मियाँची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चिकन तंदुरी हा नेहमीचा बहुपरिचित पदार्थ येथे आहेच, शिवाय खास ठाणे कट्टय़ाची अशी रान तंदुरीही येथे मिळते. मुळातच तंदुरी या पदार्थाचा शोध भारतीयांनी लावला. आता त्या पदार्थाची महती सर्वदूर पसरली आहे. मुंबईला गेल्यानंतर रान तंदुरी खाल्ल्याशिवाय परत न येणारे राहुल शेलार यांना ठाणेकरांनाही या पदार्थाची चव चाखता यावी म्हणून हा पदार्थ आपल्या तंदुरी कट्टाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. रान तंदुरी ही बकरा किंवा मेंढय़ाच्या पायापासून बनवली जाते. मात्र ठाण्यात अगदी मोजक्या ठिकाणी ती बनवली जाते. साधारण किलोच्या मापाने तंदुरी विकली जाते. सव्वा किलोपासून सुरू झालेली हा पदार्थ पावणेदोन किलोपर्यंत मिळतो. किलोनुसारच या पदार्थाची किंमत ठरवली जाते. चिकन तंदुरीबरोबरच कोलंबी, पापलेट तंदुरीही येथे उपलव्ध आहे. तंदुरीचे वेगवेगळे प्रकार स्टार्टर म्हणून खाल्ल्यानंतर चमचमीत बिर्याणी राइसची आठवण खवय्यांना होते. या दुकानाचे नाव तंदुरी कट्टा जरी असले तरी येथे बिर्याणीही अतिशय चविष्ट बनवली जाते. यामध्ये मटण व चिकनची दम बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी हे पदार्थ नेहमीच्याच प्रकाराबरोबरच आता कबाब बिर्याणी आणि चिकन टिक्का बिर्याणी या नवीन पदार्थासाठीही खवय्ये गर्दी करतात. कबाब बिर्याणी १९० रुपये तर टिक्का बिर्याणी १८० रुपयांना मिळते.

नाव जरी तंदुरी कट्टा असले तरी मांसाहाराचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तंदुरी कट्टय़ावरील बैदा रोटीसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. रुमाली रोटी आणि त्यामध्ये चिकन किंवा मटण खिमा तसेच अंड आदी जिन्नस एकत्र करून ते कमी तेलात भाजले किंवा तळले जाते. भाजून किंवा तळून मिळणाऱ्या या बैदा रोटीच्या चवीचे वर्णन करू तेवढे थोडेच आहे. शोरमा हा पदार्थ मूळचा मध्य पूर्वेकडचा. मात्र तंदुरी कट्टय़ावर तो मिळतो.  शिवाय भारतीय चव येण्यासाठीही त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे. अरब देशात हा शोरमा बनवताना मैद्याची रोटी किंवा पाव वापरला जातो, मात्र तंदुरी कट्टा येथे हा शोरमा खाताना गव्हाची रोटी बनवून त्यात भाजलेले चिकनचे तुकडे आणि शेजवान तसेच आवडीनुसार चीज किंवा मेयोनीज घालून दिले जाते. त्यामुळे चपाती न खाणाऱ्या लहान मुलांना हा शोरमा खायला दिला तर लहान मुले पौष्टिक आणि चविष्ट शोरमा आवडीने खातात. शाकाहारींसाठी शाकाहारी शोरमा, पनीर शोरमा आदी पदार्थही उपलब्ध आहेत. साधारणपणे ५० रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत शोरमा मिळतो. शेलार यांच्या दुकानाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते ग्राहकांना गरम पदार्थच खाण्यासाठी देतात.  सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत तंदुरी कट्टा खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खुला असतो.

कुठे- तंदूर कट्टा,  ठाकूर वाडी,

त्रिभुवनदास झवेरी ज्वेलर्ससमोर, बी केबिन, नौपाडा, ठाणे(प.).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 2:38 am

Web Title: tandut katta at thane
टॅग : Thane
Next Stories
1 कारवाईचा धडाका सुरूच
2 भटक्या स्थलांतरित आयुष्याला स्थैर्याची शिवण 
3 सफाई कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन
Just Now!
X