आरोग्य विभागाने दिरंगाईबाबतचा अहवाल मागवला

उपचारासाठी चार तास वणवण भटकणाऱ्या निषाद घाडी या ११ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे रुग्णालये आणि आरोग्य व्यवस्था यांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. याप्रकरणी रुग्णालयांनी उपचार करण्यास का नकार दिला, उपचारास दिरंगाई का केली याबाबतचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाने मागवला आहे. जर या प्रकरणात रुग्णालये दोषी आढळली तर या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नालासोपाऱ्यात राहणाऱ्या निषाद घाडी या ११ वर्षांच्या मुलाचा शनिवारी टँकरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. साडेचार तास उपचारासांठी त्याच्या वडिलांनी पाच रुग्णालये पालथी घातली. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद वसई-विरार शहरात उमटले असून उपचारांवर दिरंगाई करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधितत पाचही रुग्णालयांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र खुद्द पालिकेच्या तुळींज रुग्णालयातूनही निषादला परत पाठवण्यात आले होते. जखमी मुलाला घेऊन रुग्णालयांचे उबंरठे झिजवणाऱ्या निषादच्या वडिलांना अपुरी आरोग्य व्यवस्था आणि असंवेदनशीलतेचा प्रत्यय आला. साडेचार तास त्यांना पाच रुग्णालयात उपचारांसाठी फिरावे लागले, पण अखेर उपचाराअभावी निषादचा मृत्यू झाला.

रुग्णालयांमध्ये काय घडले?

लक्ष्मी नारायण रुग्णालय

जखमी निषादला घेऊन त्याचे वडील लक्ष्मी नारायण रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टर नव्हते. त्यामुळे नर्सने तपासले नाही आणि निषादला परत पाठवले. ‘निषादला आणले त्या वेळी मी आंघोळ करून देवपूजा करत होतो. तो गंभीर होता म्हणून त्याला चांगले उपचार मिळावे म्हणून मी त्याला जवळच्या पालिका रुगणालयात दाखल करण्याचा सल्ला दिला,’ असे या रुग्णालयाचे डॉ. आशीष शुक्ला यांनी सांगितले.

महापालिकेचे रुग्णालय, तुळींज

लक्ष्मी नारायण रुग्णालयातून घाडी यांनी निषादला तुळींज येथील पालिकेच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉ. राहुल वाघ यांनी निषादला टाके घातले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. तोपर्यंत निषाद ठीक होता. पुढील उपचारासाठी त्याचे सिटी स्कॅन करणे गरजेचे होते. मात्र ही सुविधा पालिका रुग्णालयात नव्हती. ‘आमच्याकडे  निषादला आणले. तेव्हा तो ठीक होता. पण रुग्णाालयात सिटी स्कॅनची सोय नव्हती, म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण त्यांनी दंडवते रुग्णालयात स्वखुशीने नेले,’ असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चौहान यांनी सांगितले.

दंडवते रुग्णालय

सिटी स्कॅन करण्यासाठी निषादला दंडवते रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दंडवते रुग्णालयाकडेही सिटी स्कॅन, अतिदक्षता विभाग यांची सुविधा नव्हती. तिथे त्यांना रिद्धिविनायक रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. ‘निषादला आणले, तेव्हा तो स्ट्रेचरवर होता. महापालिकेने त्याला आमच्याकडे का पाठवले? आमच्याकडेही सिटी स्कॅन, अतिदक्षता विभाग या सुविधा नाहीत. केवळ एकाच मिनिटात आम्ही त्याला चांगले उपचार मिळावे म्हणून रिद्धिविनायक रुग्णालयात पाठवले,’ असे दंडवते रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दंडवते यांनी सांगितले.

रिद्धिविनायक रुग्णालय

दुपारी एक वाजता निषादला रिद्धिविनायक रुग्णालयात आणण्यात आले. मात्र बालरोगतज्ज्ञ मुंबईला गेले असून ते दुपारी चार वाजता येणार आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. ‘आमच्याकडे १ वाजता निषादला आणले. त्याला दाखल करून घ्यायला तयार होतो, पण डॉक्टरच नव्हते. आमच्याकडे सोयी आहेत. पण मुलाचे वडील थांबायला तयार नव्हते म्हणून त्याला उपचार न करता परत पाठवले,’ असे रिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ. वेंकट गोयल यांनी सांगितले.

अलायन्स रुग्णालय

निषादची तब्येत बिघडत चालल्याने त्यांनी निषादला अलायन्स रुग्णालयात नेले. तेथे नेईपर्यंत निषाद कोमात गेला. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ‘आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याच्या रक्तातील हिमोग्लोबीन चापर्यंत खालावले होते. अडीच तासांच्या प्रयत्नांनंतरही निषादने प्राण सोडला,’ असे अलायन्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिल गोयल यांनी सांगितले.

सर्व रुग्णालयांकडून अहवाल मागवले आहेत. ते तपासले जातील आणि त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

डॉ. राजेंद्र चौहान, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका

निषादला वेळीच उपचार मिळायला हवे होते. महापालिकेच्या रुग्णालयातही काही सोय नव्हती. या दिरंगाईचाच तो बळी ठरला.

नरेश जाधव, नगरसेवक

टँकरचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. उपचाराबाबत काही दिरंगाई झाली का त्याची माहिती महापालिकेकडून आल्याशिवाय भाष्य करता येणार नाही.

के. डी. कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज