28 November 2020

News Flash

टँकर उलटल्याने महामार्गावर कोंडी

या टँकरमधून गॅसगळती सुरू झाल्याने पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद केली.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा

एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर वसरेवा नाका येथे उलटल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्ग गुरुवारी दुपापर्यंत विस्कळीत झाला होता. सकाळी झालेल्या या अपघातानंतर अग्निशमन दलाने गॅसगळतीवर तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मात्र, गॅसगळतीमुळे दुर्घटनेची तीव्रता वाढण्याच्या भीतीने ठाण्याहून घोडबंदरमार्गे गुजरात तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखून धरण्यात आल्याने या मार्गावर सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

महामार्गावर वर्सोवा नाका येथे वसई खाडी पुलाच्या अलीकडे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अहमदाबादकडे जाणारा एलपीजी गॅसचा टँकर उलटला. या टँकरमधून गॅसगळती सुरू झाल्याने पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद केली. मुंबई-अहमदाबाद महामार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. वर्सोवा नाका येथून वाहने वसईच्या दिशेने तसेच ठाण्याच्या दिशेने जात असतात. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर होत असते. त्यामुळे वाहतूक बंद केल्यानंतर या ठिकाणी वाहनांच्या मोठय़ा प्रमाणावर रांगा लागल्या. ठाण्याहून घोडबंदरमार्गे गुजरात तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने नागला बंदरजवळ वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. दुपार चारच्या सुमारास घोडबंदर मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली तर उरण येथून मुंब्रा तसेच घोडबंदरमार्गे गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहने मात्र भिवंडीमार्गेच सोडण्यात येत होती. त्यामुळे मुंब्रा रेतीबंदर, खारेगाव टोलनाका, मानकोली, रांजनोली आणि कशेळी मार्गावर वाहनांचा रांगा लागल्याचे चित्र होते. दुपारच्या वेळेत शहरामध्ये वाहनांची वर्दळ कमी असते आणि त्या काळात हा अपघात घडल्याने घोडबंदरवगळता शहरातील अन्य मार्गावर मात्र वाहतूक कोंडी झाली नव्हती.

नवा पूल खुला

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने टँकरवर पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली. गॅस कंपनीचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी सुमारे दीड तासांनंतर वसई खाडीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला केला. दहा-दहा मिनिटांच्या अंतरांनी दोन्ही बाजूंची वाहने हळूहळू सोडण्यात येत होती. टँकर जुन्या खाडी पुलाच्या मार्गातच आडवा झाला असल्याने हा पूल मात्र वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 3:32 am

Web Title: tanker accident near mumbai ahmedabad highway
Next Stories
1 १० महिला पोलिसांचा विनयभंग
2 अस्वच्छतेला लगाम?
3 ठाण्यात २४ तास ‘सीएनजी’
Just Now!
X