शिळफाटा मार्गावर नागरिकांचे हाल

ठाणे : महापे-शिळफाटा मार्गावर बुधवारी दुपारी रसायनाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरने अचानक पेट घेतला. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, या घटनेमुळे नवी मुंबई, महापेहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शिळफाटा ते महापे-शीळ पोलीस चौकीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

या घटनेत टँकर चालक मोहम्मद अली निजामुद्दीन शेख हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

उरण जेएनपीटीहून भिवंडी ठाण्याच्या दिशेने हजारो वाहने ये-जा करत असतात. या मार्गावरून जड-अवजड वाहतूकही सुरूअसते. बुधवारी दुपारी महापेहून ठाण्याच्या दिशेने रसायनाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर हा टँकर रस्त्यामधून बाजूला काढण्यात आला.

या घटनेमुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे दुपारी नवी मुंबईहून शेकडो वाहने अवजड ठाण्याच्या दिशेने येत असतात. बुधवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.  सायंकाळी साडेपाच नंतरही ही वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र होते.