News Flash

रणगाडय़ाला गर्दुल्ल्यांचा वेढा

भारत-पाकिस्तान युद्धातील रणगाडय़ाची मुंब्य्रात अवहेलना

भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा वैजयंता हा रणगाडा मुंब्रा स्थानकाबाहेर ठेवण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान युद्धातील रणगाडय़ाची मुंब्य्रात अवहेलना

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैजयंता रणगाडय़ाची अवहेलना होत असल्याचे चित्र आहे. शहीद मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर स्थापित करण्यात आलेल्या या रणगाडय़ाला गर्दुल्ल्यांनी आपला अड्डा बनवला आहे. दारूच्या बाटल्या आणि कचऱ्यांनी वेढल्या गेलेल्या या रणगाडय़ाच्या पोकळींमध्ये अमली पदार्थ दडवण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन वा सुरक्षा यंत्रणांनी कारवाई न केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा वैजयंता हा रणगाडा मुंब्रा स्थानकाबाहेर ठेवण्यात आला आहे. श्रीनगर येथील बीजबेहरा भागात २००६ साली हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या फैजल याला मनीष पितांबरे यांनी कंठस्नान घातले होते. शहीद मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ हा रणगाडा या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सहकार्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष या संस्थेला हा रणगाडा मिळाला होता. १९ मे २०१३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या रणगाडय़ाचा स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला. याच काळात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी मुंब्रा भागात विकासाचे अनेक प्रकल्प राबविले. त्यामुळे आमदार आव्हाड यांनी ‘मुंब्रा बदल रहा है’ अशी जाहिरात करत रणगाडा या भागात आणून मोठय़ा धुमधडाक्यात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र सुरुवातीच्या काळात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांचे रणगाडा परिसरातील दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका आता या भागातील नियमित ये-जा करणारे रहिवाशी करू लागले आहेत.

या रणगाडय़ाचे संरक्षण करण्यासाठी २४ तास सुरक्षा रक्षक ठेवण्यात येतील असे आव्हाड यांनी शुभारंभप्रसंगी सांगितले होते. मात्र सध्या या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून रणगाडा आहे तेथेच गर्दुल्ल्यांचा वावर दिसू लागला आहे. सध्या या रणगाडा ठेवलेल्या आतील भागात प्रवेश करू नये यासाठी रणगाडय़ाभोवती कुंपण करण्यात आले आहे. मात्र कुंपणावरून उडय़ा मारून गर्दुल्ले व भिकारी आत शिरतात. त्यामुळे रणगाडय़ाभोवती कचरा साचल्याचे चित्र दिसून येते. या घाणीमुळे येथे उंदरांचा वावरही वाढला आहे. स्मारकाच्या कुंपणावर गर्दुल्ल्यांनी थुंकून घाण केलेली आहे. अनेक जण छायाचित्र काढण्यासाठी या रणगाडय़ावर चढत असतात. दररोज या रणगाडय़ाची अशा प्रकारे विटंबना होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रणगाडय़ावर अनेकदा गर्दुल्ले बसतात. या परिसरात घाण, लघुशंकादेखील केली जात असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, असे परिसरात राहणारे सुरेश पाटील या रहिवाशाने सांगितले.

राजकीय फलकांनी कुंपणही गारद

रणगाडय़ाचे महत्त्व स्थानक परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना समजावे, या रणगाडय़ाविषयी माहिती व्हावी यासाठी मुंब्रा स्थानकाबाहेरच हा रणगाडा ठेवण्यात आला आहे. मात्र रणगाडय़ाच्या कुंपणाभोवतीच राजकीय फलक लावण्यात येत असल्याने हा रणगाडा रस्त्यावरून दिसतदेखील नाही.

रणगाडय़ाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणी मी वारंवार केली आहे.  मात्र महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रपतींकडून देशाचा मान राखणारा हा रणगाडा भेट म्हणून दिला आहे. त्याची स्वच्छता जर महापालिकेला राखता येत नसेल तर महापालिका प्रशासनाने राष्ट्रपतींना एक पत्र लिहावे आणि रणगाडा सांभाळता येत नसून घेऊन जावा, असे या पत्रामध्ये सांगावे.

 – जितेंद्र आव्हाड, आमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 1:53 am

Web Title: tanks used in india pakistani war surrounded by drug addict in mumbra
Next Stories
1 टपाल कार्यालये उद्यापासून बंद
2 फडके मार्गाला ‘सांस्कृतिक’ बाधा
3 निमित्त : स्वावलंबनाची सोबत..
Just Now!
X