शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न अपयशी; शेतकऱ्यांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी

नौपाडय़ातील आंबा विक्री स्टॉलवरून झालेल्या वादाच्या माध्यमातून पक्षाचे शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न शुक्रवारी सपशेल अपयशी ठरला. शेतकऱ्यांचा महामोर्चा या नावाने शुक्रवारी मनसेने काढलेल्या मोर्चात मनसेच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी पाहायला मिळाली. या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जेमतेम होती.

नौपाडा येथे आंबा स्टॉलवरून भाजप आणि मनसेमध्ये वाद झाला होता. या वादानंतर मनसेने १७ मे या दिवशी ठाण्यात राज्यभरातील शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्याचे ठरविले होते. हा मोर्चा ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दुपारी एक वाजता हा मोर्चा गावदेवी मैदानातून निघणार होता. मात्र दुपारी दोनपर्यंत कार्यकर्ते जमत नव्हते. ज्या आंबा व्यावसायिकांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता त्या आंबा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची संख्याही अत्यंत तुरळक पाहायला मिळाली. तर ठाणे जिल्ह्य़ाशी काहीही संबध नसलेले मराठवाडय़ातील शेतकरी दुपारी २ नंतरही कार्यकर्ते जमत नसल्याने चिंतेत होते.

अखेर तीन वाजता हा मोर्चा गावदेवी मैदानातून घोषणा देत निघाला. शेतकऱ्यांच्या न्याय घोषणेपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील घोषणांचा यात जास्त प्रमाणात सामावेश होता. अवघ्या अर्धा तासात हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर पोहोचला. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी येथे छोटीसी सभा घेत विविध मागण्यांचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.

सेल्फी काढण्यासाठी गर्दी

मनसेच्या मोर्चानिमित्त शहरातील विविध भागांतून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर कार्यकर्ते गावदेवी मैदानात एकत्र जमले होते. या वेळी मोर्चानिमित्त उपस्थित असलेल्या नितीन नांदगावकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी आपल्या व्यथाही त्यांच्यासमोर मांडल्या. तर काही कार्यकर्ते शेतकरी मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांसोबत आणि बैलगाडय़ांसोबत सेल्फी काढण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकरी मोर्चापेक्षा सेल्फी मोर्चा अधिक भासत असल्याची चर्चा नागरिकांकडून होत होती.

मला शिकायचं होतं.. पण पैसेच नाही..

बीड येथून आलेल्या मोहर घुले (२३) यांचे पती अशोक यांनी तीन वर्षांपूर्वी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. मोहर आणि अशोक यांचा विवाह होण्यापूर्वी त्यांनी ९वी पर्यंत शिक्षण घेऊन शिक्षण सोडून दिले होते. पतीच्या आत्महत्येनंतर मात्र, त्यांनी १२ वीच्या विज्ञान शाखेची नुकतीच परीक्षा दिली आहे. त्यांना १० वीत ८३ टक्के होते. पुढे शिकायचे होते. मात्र शिकण्यासाठी पैसे नाहीत. पोलीस दलात किंवा एखादी नोकरी करण्याचा विचार असल्याचेही त्या म्हणाल्या. अशीच कथा २५ वर्षीय जयश्री घोलवे यांनी बोलून दाखविली.

शेतकऱ्याची अवस्था गुराढोरांसारखी

परभणी येथून आलेले ज्ञानेश्वर शिंदे यांनीही व्यथा बोलून दाखवली. दुष्काळ असल्याने जनावरांना जे पाणी येते तेच प्यावे लागत आहे. पूर्वीचे सरकार बरे होते. पण युती सरकाने निराशा केली आहे. मजुरीवर आता भागवावे लागत आहे. गुराढोरांसारखी अवस्था आमची झाल्याचे ते म्हणाले.