खवय्ये नेहमीच चविष्ट पदार्थाच्या शोधात असतात. त्यामुळे गल्लीबोळातील एखादे छोटे आणि चविष्ट खाद्यपदार्थाचे दुकानही खवय्ये शोधून काढतात आणि मग त्या पदार्थाची चव घेण्यासाठी कट्टय़ावरील मित्र-मैत्रिणींनासुद्धा घेऊन जातात. त्यानंतर त्या दुकानातील खाद्यपदार्थाची महती सर्वदूर पसरते. सॅन्डवीच या पदार्थाचेही तसेच आहे. लहानथोर सर्वानाच सॅन्डवीच खूप आवडते. लहान मुलांना तर पौष्टिक पदार्थ म्हणून आवर्जून सॅन्डवीच खायला दिले जाते. या रुचकर चवीच्या सॅन्डवीचसाठी ठाण्यातील ‘प्रीती सॅन्डवीच’चे नाव आवर्जून घेतले जाते. चमचमीत आणि गरमागरम सॅन्डवीच खाण्याचे बहुतेक ठाणेकरांचे हे आवडते ठिकाण आहे. इतकेच नव्हे तर आता पास्ता, नाचोस रिसेटो या पदार्थाचीही या दुकानात खवय्ये मोठय़ा प्रमाणात मागणी करताना दिसतात.

ब्रिटिश भारतात आले आणि सॅन्डवीच या पदार्थाचा शोध भारतीयांना लागला. चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याच्या भारतीयांच्या सवयीमध्ये मग खाद्यपदार्थ तरी कसे मागे राहतील? पूर्वी सॅन्डवीचला डबल रोटी असे संबोधले जात होते. मात्र कालांतराने सॅन्डवीच म्हणूनच हा पदार्थ नावारूपास आला. काकडी, गाजर,बीट, उकडलेल्या बटाटय़ांची भाजी अथवा चकत्या, तसेच विविध पदार्थ घालून हे पौष्टिक सॅन्डवीच तयार केले जात असे. मात्र काळानुरूप या पदार्थामध्ये विविध पदार्थाची भर पडली. सॅन्डवीच अधिकाधिक चविष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने प्रीती सॅन्डवीच या दुकानात केला जातो. शनिवारच्या सायंकाळी तलावपाळीचा फेरफटका मारून झाल्यानंतर जिभेचे आणि पोटाचे चोचले पुरविण्यासाठी ठाणेकर हमखास या प्रीती सॅन्डवीचला भेट देतात. गरमागरम सॅन्डवीच गार होईपर्यंत थांबण्याचाही खाणाऱ्याला धीर होत नाही. येथील सॅन्डवीच पार्सल न्यायचे असल्यास पिझ्झा बॉक्समध्ये बंद करून दिले जाते. व्हेज सॅन्डवीच, व्हेज मयो, व्हेज चीज सॅन्डवीच,व्हेज चीज क्लब, फ्रुट क्लब आदी प्रकार प्रीती सॅन्डवीचकडे हमखास खायला मिळतात. पुर्वीपासून मिळणारे व्हेज टोस्ट सॅन्डवीचची चव आजही तशीच आहे. या परिसरातून जाता-येताना  सॅन्डवीचच्या वासानेच सॅन्डवीच खाण्याचा मोह आवरता येत नाही. ग्रील सॅन्डवीचमध्येही व्हेज ग्रील,मॅगी चीज ग्रील,मुंबई चीज ग्रील ,मया चीज ग्रील,प्रीती स्पेशल व्हीजा बाईट आदी प्रकारचे सॅन्डवीच येथे खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. यात मुंबई चीज ग्रीलमध्ये चटपटीत मुंबईकरांना आवडणाऱ्या चवीचे हे सॅन्डवीच असून ठाणेकर या सॅन्डवीचला अधिक पसंती देतात. पिझ्झ्याचे अनेक प्रकारही येथे उपलब्ध आहेत. त्यामुळेच सॅन्डवीचप्रमाणेच पिझ्झा खाण्यासाठीही खवैय्ये येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात.  या सॅन्डवीचची खासियत म्हणजे सॅन्डवीचमध्ये प्रामुख्याने वापरण्यात येणारी चटणी. दिवसाला १० किलो लागणारी ही चटणी पुदीना आणि घरचे मसाले वापरून बनवत असल्याचे प्रीती सॅन्डवीचचे मालक दुर्गेशचंद्र गुप्ता यांनी सांगितले. मात्र शनिवारी व रविवारी १५ ते २० किलो चटणी बनवावी लागत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. चॉकलेट सॅन्डवीच हा प्रकार तर यम्मी असे म्हणतच खावा लागतो. तिखट सॅन्डवीच खाल्ल्यानंतर चॉकलेट सॅन्डवीच खाण्यासाठी लहान मुलेच काय मोठी माणसेही आतुरलेली असतात. दुर्गेशचंद्र गुप्ता म्हणाले, आम्ही सुरुवातीला तलावपाळी येथे गाडी लावत होतो. मात्र त्यानंतर आता जांभळीनाका येथील खेमा गल्लीमध्ये गाडी लावण्यास सुरुवात केली आहे. सॅन्डवीचच्या व्यवसायाला आता २५ वर्षे उलटली. मात्र हे छोटे दुकान घेऊन १७ वर्षे झाल्याचे सांगितले. पदार्थ आणि जागेमध्ये जरी काळाप्रमाणे बदल झाला, तरीही चवीमध्ये मात्र  तीळमात्र बदल झाला नाही हे या दुकानाचे वैशिष्टय़ आहे. कॉर्न चीज टोस्ट सॅन्डवीचलाही खूप मागणी असून बेस्ट चवीचे असणारे हे सॅन्डवीचही ग्राहकांच्या पसंतीचे आहे.

नाचोस हा नवीन प्रकारही प्रीती सॅन्डवीचकडे उपलब्ध आहे. नाचोस हा जरी मॅक्सिकोचा पदार्थ असला तरी प्रीती सॅन्डवीचकडे हा पदार्थ खाल्ल्यानंतर हमखास मॅक्सिकोला जाऊन पदार्थ खाल्ल्यासारखे वाटेल. यामध्ये पापडी आणि विविध मसाले वापरले जातात. मात्र हे मसाले खास घरीच तयार करतो असे दुर्गेशचंद्रचे धाकटे भाऊ हरीश गुप्ता याने सांगितले. यामध्ये नाचोस विथ साल्सा सॉस,चीज सॉस,नाचोस विथ साल्सा इन मॅक्सिको स्टाइल आदी पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत. हे सर्व सॅन्डवीच व्हाइट आणि ब्राऊन ब्रेड आदी प्रकारात मिळतात. त्यामुळे त्यांची किंमतही या पावावरूनच ठरवलेली आहे. ब्राऊन ब्रेडची किंमत अधिक असली तरी बरेचजण गव्हाचा ब्रेड असल्याने अधिक पौष्टिक असतो या विचाराने तो खाणे पसंत करतात. त्याचप्रमाणे व्हाइट ब्रेडचे सॅन्डवीचही चविष्ट असतात. १५ रुपयांपासून सुरू होणारे हे सॅन्डवीच जास्तीत जास्त १५० रुपयांना मिळते तर १०० ते १३० रुपयांपर्यंत नाचोसची किंमत आहे. पिझ्झाही १०० रुपये ते १५० रुपयापर्यंत येथे सहज उपलब्ध आहे. रिसोटो नावाचा इटालियन राइस नावाचा आणखी एक चवदार पदार्थ खाण्यासाठीही खवय्ये येथे गर्दी करताना दिसतात. ़िवशेष म्हणजे हे दुकान दुपारी ३ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत चालू असते. मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसात टेंभी नाक्यावरची देवी जवळच असल्याने रात्री दीडपर्यंत या दुकानात गरमागरम सॅन्डवीच, पिझ्झा, नाचोस आणि रिसेटो खायला आवर्जून ठाणेकर भेट देतात. दुकान कधीही बंद नसल्यामुळे रात्री उपाशी झोपण्याची वेळ ठाणेकरांवर येत नाही.

प्रीती सॅन्डवीच – मासुंदा तलावपाळी, चिंतामणी ज्वेलर्सच्या मागे, ठाणे (प.)

वेळ – दुपारी ३ ते रात्री साडेअकरा