ठाणे : महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवारी दिले आहेत. या आदेशानंतर महापालिकेच्या पथकांनी अशा मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली. त्यामध्ये नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या कामात महापालिका यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून व्यग्र आहे. यामुळे यंदाच्या वर्षांचा मालमत्ता कर मे महिना अखेपर्यंत वसूल करणे प्रशासनाला शक्य झाले नव्हते. मात्र, जून महिन्याच्या मध्यापासून प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन मालमत्ता करवसुली करण्यावर भर दिला आहे. सप्टेंबर महिनाअखेपर्यंत २४१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. असे असतानाच आता थकीत मालमत्ता कर वसूल करण्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षांतील मालमत्ता कर भरलेला नाही अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार नौपाडा प्रभाग समितीमधील नौपाडा-बी केबीन परिसरातील थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे लावण्यात आले. उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, उप करनिर्धारक व संकलक अनघा कदम आणि कर निरीक्षक अनंत मोरे यांनी ही कारवाई केली. तसेच ज्यांनी मालमत्ता कर अद्यापपर्यंत जमा केलेला नाही, अशा सर्व मालमत्ताधारकांनी कराची रक्कम तात्काळ जमा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.