कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमिनीवरील करयोग्य मूल्य इतर पालिकांच्या तुलनेत १०० टक्के म्हणजे सर्वाधिक आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील गुंतवणुकीवर, पालिकेच्या महसुलावर परिणाम होत आहे. इतर पालिकांच्या समप्रमाणात कल्याण डोंबिवली पालिकेचा कर असावा. विकासकांची या वाढीव कर प्रणालीतून सुटका करावी. या कर प्रणालीत सुसूत्रता आणण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने प्रशासनाने भांडवली गुंतवणुकीवरील परताव्यानुसार (कॅपिटल व्हॅल्यू बेसिस-कॉन्ट्रॅक्ट टेस्ट मेथड) जमिनीवरील कर आकारणी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी येत्या महासभेत ठेवण्यात येणार आहे.

१९९० नंतर पालिकेच्या इतिहासात प्रथमच जमिनीवरील कर आकारणीत फेरबदल करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. १५ ऑक्टोबर १९९० मध्ये कल्याण पालिकेच्या प्रशासकांनी जमीन कर आकारणी व वसुलीत एक सूत्र असावे म्हणून ‘भांडवली गुंतवणुकीवरील परताव्यावर’ (कॅपिटेल व्हॅल्यू बेसिस) कर वसुलीचे धोरण ठरविले. जमिनीच्या मूल्यावरून वार्षिक १० टक्के अपेक्षित उत्पन्न लक्षात घेऊन तेवढेच वार्षिक भाडेमूल्य मिळेल, असा धोरणकर्त्यांचा विचार होता. या धोरणाप्रमाणे प्रशासकांना जमिनीचे दरवर्षी वाढणारे दर, शीघ्रगणकानुसार (रेडीरेकनर दर) उपनिबंधकांकडून जमिनीच्या परिसराप्रमाणे आकारण्यात येणारे मुद्रांक मूल्य आणि जमिनीवर इमारत बांधून पूर्ण झाल्यावर त्या भाडय़ापोटी (वापरकर्ते) पालिकेला मिळणारा कर, असा दुहेरी विचार करून भांडवली गुंतवणुकीवरील परताव्याप्रमाणे जमिनीचे ‘करयोग्य मूल्य’ निश्चित करणे आवश्यक होते. परंतु, कर विभागातील अधिकाऱ्यांनी १० टक्के गुंतवणुकीवरील वार्षिक परतावा म्हणजे भाडे दर समजून त्यातून १० टक्के सांविधिक वजावट करून ‘करयोग्य मूल्य’ निश्चित केले. हे करताना जमिनीच्या दरवर्षी वाढणाऱ्या किमतीचा, गुंतवणुकीवरील परताव्यात जे बदल झाले त्यात अधिकाऱ्यांनी मागील २८ वर्षे विचार केला नाही, असे आता प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

विसंगती दूर करण्याचा प्रयत्न

महापालिका हद्दीतील जमिनीवर एक हजार चौरस मीटर क्षेत्रावर कर आकारणी करताना जमिनीचे क्षेत्रफळ गुणिले शीघ्रगणक दर गुणिले जमीन किमतीवरील परतावा आणि त्यातून १० टक्के वजावट गुणिले पालिकेचा ७१.५ टक्के दर अशा पद्धतीने कर वसुली गणित केले जाते. त्याप्रमाणे जमीन (भूखंड) करापासून या सूत्राप्रमाणे तीन लाख २१ हजार ७५० रुपये कर होतो. याच क्षेत्रफळाच्या भूखंडावर ‘इमारत’ बांधल्यास कर विभागाकडून क्षेत्रफळ गुणिले २६ रु. मासिक भाडेदर गुणिले १२ महिनेचे वार्षिक भाडे वजा १० टक्के वैधानिक कपात बरोबर दोन लाख ७७२ इतके करयोग्य मूल्य निश्चित केले जाते.  म्हणजे, बांधकाम सुरू असलेल्या जमिनीचा कर इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत जास्त आणि इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर भाडय़ाने (वापरकर्त्यांना हस्तांतरण) देईपर्यंत त्याचा कर दर कमी होतो, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही विसंगती प्रचलित कर प्रणालीत सुधारण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिक करामुळे महसुली उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कोणालाही जाचक होणार नाही अशा पद्धतीने  प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

राजेंद्र देवळेकर,महापौर