ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांना ठाणे महानगरपालिकेकडून अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार या चारजणांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. तब्बल ७२ दिवस कारागृहात काढल्यानंतर हे नगरसेवक नुकतेच जामिनावर सुटले होते. राज्याच्या नगरविकास विभागाने येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. महापालिका स्तरावर ही कारवाई पूर्ण झाली नाही, तर शासन आपल्या अधिकाराचा वापर करून या नगरसेवकांना अपात्र ठरवेल, असे या आदेशात म्हटले होते. या कारवाईमुळे या चारही नगरसेवकांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या नावांचा उल्लेख केला होता. या आधारे परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत या चौघांविरोधात गुन्हा दाखल करत ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली. तब्बल ७२ दिवसांनंतर या चौघांनाही टप्प्याटप्प्याने जामीन मंजूर झाले होते.