चिकणघर विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) घोटाळ्याची नस्ती (फाइल) नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम कार्यवाहीसाठी पाठविली आहे. यासंबंधीचा चौकशी अहवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरविकास विभागाकडे रवाना करण्यात आला आहे. आता त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.
गेल्या वर्षांपासून विधिमंडळात महापालिकेचा टीडीआर घोटाळा गाजतोय. चिकणघर येथील जागा पालिकेच्या ताब्यात नसताना तत्कालीन पालिका आयुक्त व नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी जमीन मालक, विकासकांशी हातमिळविणी करून या जागेचा कोटय़वधी रुपयांचा टीडीआर विकल्याचा आरोप आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत सुमारे १२४ कोटी रुपये आहे, असे यासंबंधी तक्रार करणारे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचे म्हणणे आहे. यासंबंधी आमदार परब यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या जागेवर अतिक्रमणे आहेत. तरीही महापालिका, चौकशी अधिकाऱ्यांनी या जागेवर अतिक्रमणे नसल्याची माहिती अहवालात दिली असल्याचे परब यांचे म्हणणे आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे. टीडीआर घोटाळ्याचे अहवाल नगरविकास विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत.