बदलापूर पालिकेमध्ये सध्या गाजत असलेल्या टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य पाच अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी नागेश जाधव यांच्याकडे बुधवारी सकाळी हजेरी लावली.

पालिकेतील टीडीआर घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, साहाय्यक नगर रचनाकार सुनील दुसाने, अभियंते अशोक पेडणेकर, तुकाराम मांडेकर, किरण गवळे, नीलेश देशमुख तसेच तत्कालीन नगराध्यक्षांविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक तुषार बेंबाळकर यास उल्हासनगर न्यायालयाने पहिल्यांदा पाच दिवस आणि त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. कल्याणच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुख्याधिकारी गोसावी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २९ सप्टेंबर रोजी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिल्याने तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी व इतर अधिकारी हजर झाले. या आरोपींची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली.

या प्रकरणात अन्य कोणी आहे का याचाही पोलीस कसून तपास करीत आहेत.