News Flash

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या हाती अभ्यासाच्या प्रती

ऑनलाइन शिक्षण शक्य नसलेल्यांना घरी जाऊन अध्यापन

शहापूरमधील शिक्षक दाम्पत्याचा उपक्रम; ऑनलाइन शिक्षण शक्य नसलेल्यांना घरी जाऊन अध्यापन

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : दुर्गम भाग असल्यामुळे मोबाइलला नेटवर्क नाही. टाळेबंदीमुळे रोजगार बुडाल्याने मुलाच्या ऑनलाइन शिक्षणासाठी हजारोंचा मोबाइल कसा खरेदी करायचा, असा प्रश्न शहापूर तालुक्यातील पालकांना पडला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाऱ्याचापाडा शाळेच्या शिक्षक दाम्पत्याने अनोखा उपक्रम हाती घेतला. राज्यातील विविध शिक्षकांनी तयार केलेल्या पीडीएफच्या प्रती हे शिक्षक दाम्पत्य विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन देत असून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत.

शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वाऱ्याचापाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत प्रमोद पाटोळे आणि शर्मिला पाटोळे हे प्रयोगशील शिक्षक दाम्पत्य इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. मार्च महिन्यापासून करोनाचे संकट आल्याने राज्य सरकारतर्फे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यापासून राज्यातील अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. याच पद्धतीने वाऱ्याचापाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाटोळे दाम्पत्यांनी ऑनलाइन शिक्षणाची सुरुवात केली. अतिशय दुर्गम भाग असलेल्या वाऱ्याचापाडा भागातील अनेक नागरिकांकडे अँड्रॉइड फोन नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात या शिक्षक दाम्पत्याला अनेक अडचणी आल्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रमोद यांनी गावातील तरुणांच्या मोबाइलमध्ये दिक्षा अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून दिले. नेटवर्कची समस्या असल्याने तेही शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे पाटोळे आणि त्यांच्या पत्नीने राज्यातील विविध शिक्षकांनी तयार केलेले पीडीएफ जमा केले. त्या पीडीएफच्या प्रती काढून आणि त्यांचे इयत्तानुसार वर्गीकरण केले. त्यामध्ये चित्र ओळखणे, चित्र रंगवणे, बेरीज-वजाबाकी, इंग्रजी भाषांतर, चित्र वर्णन पाठांवरील प्रश्नउत्तरे अशा प्रकारे नियोजन करून सर्व प्रती हे दाम्पत्य आठवडय़ातून दोन ते तीन दिवस विद्याथ्र्र्याच्या घरी जाऊन पोहोचवत आहे. विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर त्याची तपासणी करणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे कार्यदेखील हे दाम्पत्य पार पाडत आहे. कमी खर्चात राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे पालकही समाधान व्यक्त करत आहेत. तर, हा अनोखा उपक्रम राबवल्यामुळे अधिक आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया पाटोळे शिक्षक दाम्पत्यांनी दिली आहे.

शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात मोबाइल नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे अनेकदा ऑनलाइन शिक्षणात अडथळा येतो. मात्र, या समस्येवर मात करून वाऱ्याचापाडा शाळेच्या शिक्षक दाम्पत्यांनी अनोखा उपक्रम राबवला असून ही बाब कौतुकास्पद आहे. हाच उपक्रम जिल्ह्य़ातील इतर शाळांमध्ये राबवण्याचा विचार सध्या प्रशासनातर्फे सुरू आहे.

– संगीता भागवत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:44 am

Web Title: teacher couple distributed pdf copies to students living in remote area zws 70
Next Stories
1 ठाणे पालिकेची शून्य कोविड मोहीम
2 प्रदूषण नियंत्रण मंडळाची ‘कडोंमपा’ला नोटीस
3 उच्चभ्रूंच्या वस्तीत करोनाचा फैलाव
Just Now!
X