शाळेत किंवा महाविद्यालयात गेल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचा अपवाद वगळला तर अनेक विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हा विषय त्यांचा ‘शत्रू’ असतो. इंग्रजी विषयाची भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे बरेच विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात गटांगळी खातात आणि पुढे महाविद्यालयातही अभ्यास अवघड जातो. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीचा हा बागुलबुवा घालवून त्यांच्या मनात या विषयाची आवड निर्माण करण्याचे आणि इंग्रजी ‘अवघड झाले सोपे हो’ असे करून देण्याचे काम डोंबिवलीचे वसंत पटवारी हे निवृत्त शिक्षक मन:पूर्वक आणि तळमळीने करत आहेत.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

पटवारी हे मूळचे विदर्भातील अमरावतीचे. त्यांचे वडील वामन धुंडीराज पटवारी हेही शिक्षक होते. तेव्हाच्या दहावीनंतर (अकरावी मॅट्रिक) वसंत पटवारी हे केंद्र शासनाच्या शेतकी खात्यात नोकरीला लागले. नोकरी करत असतानाच त्यांनी इंग्रजी विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, पण नोकरीत त्यांचे मन काही रमले नाही. पटवारी यांचे ज्येष्ठ बंधू श्रीपाद वामन ऊर्फ आबासाहेब हे डोंबिवलीकर. त्यांच्या सांगण्यावरून वसंत पटवारी डोंबिवलीत आले. आबासाहेबांनी वसंतरावांची भेट ठाण्याच्या मो.ह. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. कुलकर्णी यांच्याशी घडवून दिली. शाळेत तेव्हा इंग्रजी विषयासाठी शिक्षकाची आवश्यकता होती. कुलकर्णी सरांनी त्यांना शाळेत याल का म्हणून विचारणा केली आणि वसंत पटवारी मो. ह. विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे कुलकर्णी सरांनीच त्यांना ‘एम.ए.’ करायला लावले. इंग्रजी विषय घेऊन ते ‘एम.ए.’ झाले. मो.ह. विद्यालयातील ३० वर्षांच्या सेवेनंतर पटवारी सर निवृत्त झाले.

ज्या विद्यार्थ्यांचे पालक सधन आहेत त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा अन्य विषयांसाठी खासगी शिकवणी लावता येणे शक्य होते, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीसाठी खासगी शिकवणी वर्ग लावणे शक्य नव्हते. त्यामुळे मग अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मोफत इंग्रजी शिकविण्याचे व्रत घेतले आणि आज वयाच्या ७९ व्या वर्षांतही त्यांचे शिकविणे अविरत सुरू आहे. वडील वामन पटवारी व एस. व्ही. कुलकर्णी सर यांच्यापासून ही प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात.

शाळेतील शिपाई आणि पोलिसांच्या मुलांना त्यांनी शाळा सुटल्यानंतर दररोज एक तास याप्रमाणे इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात केली. ठाण्यात त्या वेळी जे. एफ. रिबेरो हे पोलीस आयुक्त होते. पटवारी सरांचे काम त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी पोलीस मुख्यालयात पोलिसांच्या मुलांसाठी इंग्रजी विषय शिकविण्याची विनंती पटवारी यांना केली आणि नाममात्र मानधनावर त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांनाही इंग्रजी विषय शिकविणे सुरू केले. पुढे पटवारी सरांनी ठाण्यात भांडार आळी, कौपिनेश्वर मंदिराजवळ बाजार गल्लीत, त्यांचे सहकारी शिक्षक चौधरी सरांच्या घरी तसेच मुलुंड येथेही इंग्रजी विषयाचे शिकवणी वर्ग सुरू केले. या सर्व ठिकाणी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न घेता इंग्रजी विषय शिकविला.

पटवारी सर १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांच्या इंग्रजी शिकवणी वर्गाच्या कामाने आणखी गती घेतली. पुढे पटवारी वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आले. महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवर तेथील वनवासी विद्यार्थ्यांसाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या निवासी शाळा आहेत. तेथे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते आणि सुरेंद्र बाजपेयी सर शिकवायला जायला लागले. पटवारी सर तेथे साहजिकच इंग्रजी विषय शिकवीत असत. तलासरी येथील विद्यार्थ्यांनाही त्यांनी इंग्रजी शिकविले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां अनुताई वाघ यांच्याशी त्यांची भेट झाली. कोसबाड येथील त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्यांनी प्रा. रमेश पानसे यांच्या सहकार्याने इंग्रजी विषयाचे धडे दिले.

मुलांमधील इंग्रजी विषयाची भीती कमी करून त्यांच्यात या विषयाची गोडी निर्माण करण्याचे व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याचे त्यांचे काम आजही सुरूच आहे. डोंबिवलीत सेवानिवृत्तांच्या संघटनेच्या कार्यकारिणीवर ते आहेत. संघटनेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठांच्या नातवंडांना कोणतेही शुल्क न घेता ते आजही इंग्रजी शिकवितात. अर्थात हे शिकविणे फक्त बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांपुरतेच त्यांनी मर्यादित ठेवले आहे. परीक्षेच्या वेळी कोणी विद्यार्थी आजारी पडला तर त्याच्या घरी जाऊन त्याला शिकविण्याचे कामही ते करतात.

आपल्याकडे अभ्यासक्रम बदलत असतो. इयत्ता दहावीपर्यंतचे इंग्रजी खूप सोपे करून टाकले आहे. त्यामुळे मराठी माध्यमातील आपले विद्यार्थी महाविद्यालयात गेले की त्यांना अकरावी/बारावी व पुढेही हा विषय कठीण जातो. सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी विषयाची भीती मुलांनी मनातून काढून टाकली पाहिजे. एकदा का ही भीती दूर झाली आणि इंग्रजीचे व्याकरण समजून घेतले, की हा विषय अवघड वाटणार नाही. इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांनी विद्यार्थिदशेतच दररोज इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याची सवय लावून घ्यावी. आता विविध वृत्तवाहिन्यांचा पर्यायही उपलब्ध आहे. त्यावरील इंग्रजी बातम्याही जरूर ऐकाव्यात. इंग्रजीची आवड निर्माण करण्यासाठी सुरुवात गोष्टींच्या पुस्तकांपासून करावी. आपल्याला माहिती असलेल्या पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत या गोष्टी इंग्रजीतून वाचाव्यात, असा सल्लाही पटवारी सर देतात. या वयातही त्यांचा उत्साह आणि जिद्द कायम आहे. डोंबिवलीतील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेतील सभासदांच्या हुशार असलेल्या बारावीतील मुलांसाठी त्यांना इंग्रजी विषय शिकवायचा आहे. गणित व भौतिकशास्त्र विषयांचेही शिकवणी वर्ग सुरू करायचे आहेत. वैद्यकीय शाखेच्या ‘सीईटी’ परीक्षेसाठी बसणाऱ्या काही निवडक विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन करायचे आहे.

पटवारी यांच्या पत्नी वंदना याही शिक्षकी पेशातील. त्या डोंबिवलीतील स. है. जोंधळे विद्यालयातून मुख्याध्यापिका/प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या आहेत. पटवारी यांना या संपूर्ण कामात पत्नीचा तसेच प्रसाद व प्रसन्न ही दोन मुले, सुना यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्यामुळेच या वयातही मी हे काम करू शकतो, असे ते अभिमानाने सांगतात.  मी माझ्या समाधानासाठी आणि आनंदासाठी हे काम करतो, त्यातून कोणताही आर्थिक फायदा मिळविण्याचा माझा उद्देश नाही. मी हाती-पायी धडधाकट असेपर्यंत शेवटपर्यंत माझ्याकडून हे शिकविण्याचे काम होत राहावे, इतकीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना असल्याचे ते सांगतात.

वसंत पटवारी ९३२२९८९३३८