जिल्हा परिषदेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी अभिनय केलेला हृदयस्पर्शी लघुपट; कल्याणच्या शाळेत चित्रीकरण
लाइट.. कॅमेरा.. आणि अ‍ॅक्शन. अन्य कोणत्याही चित्रपट किंवा मालिकांच्या सेटवर ऐकू येणारे हे तीन शब्द मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कल्याणमधील पिसवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ऐकू येत होते. विशेष म्हणजे इथे कोणी सुप्रसिद्ध दिग्दर्शक, नामांकित अभिनेता नव्हता. विद्यार्थी आणि त्यांचे जिल्हा परिषदेचे शिक्षकांच्या उपस्थितीत चित्रीकरण केले जात होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी हा सगळा गोतावळा जमवला होता. निमित्त होते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारणाऱ्या ‘माझ्या गुरुजींची गाडी’ या लघुपटाच्या निर्मितीचे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांविना सुन्या असलेली या शाळेकडे सहसा कोणी फिरकत नाही. मात्र कल्याणच्या पिसवली येथील शाळेतील शिक्षकांनी मात्र या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांच्या मदतीने चक्क एका लघुपटाची निर्मिती केली. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाचा उलगडा करून देणाऱ्या ‘माझ्या गुरुजींची गाडी’ या लघुपट या मंडळींनी साकारला असून लवकर हा लघुपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शाळेतील २७ विद्यार्थ्यांचा समावेश या लघुपटात आहे. ७ शिक्षकांनीही यात भूमिका साकारून हा लघुपट यशस्वीपणे चित्रित केला. पिसवली शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजय पाटील यांच्या कल्पनेतून हा लघुपट साकार झाला आहे.

काय आहे लघुपटात
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले ऋणानुबंध निर्माण होत असतात. हेच ऋणानुबंध लघुपटाच्या निमित्ताने जगासमोर आणण्याचा प्रयत्न या शिक्षकांनी सुरू केला. नव्याने शाळेमध्ये आलेल्या शिक्षकांच्या गाडीबद्दल विद्यार्थ्यांची आपुलकी या लघुपटाच्या माध्यमातून पडद्यावर उलगडण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. सोमनाथ वाळके यांच्या ‘माझ्या गुरुजींची गाडी’ या कथेवर हा लघुपट बेतलेला असून पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा अजय पाटील यांनी संभाळली आहे. या लघुपटाचे निर्माते अजय यादव आहेत. नाटय़ लेखनाची पाश्र्वभूमी असलेल्या पाटील यांनी आपल्या अन्य मित्रांच्या मदतीने हे शिवधनुष्य उचलले आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये या लघुपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.