ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे याकरिता महापालिका प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांत अनुक्रमे आठ आणि ११ शिक्षक नेमण्याचा प्रस्ताव पालिकेने आता आणला आहे.
खासगी आणि इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे उघड झाल्यानंतर  प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरू केल्या. मात्र, या शाळांकरिता शासनाकडून अद्याप शिक्षक तसेच शिपाईपदाकरिता मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक अस्थायी स्वरूपात काम करीत आहेत.
दरम्यान, तब्बल १२ वर्षांनंतर या शाळेकरिता शिक्षक तसेच शिपाईपदाची निर्मिती करण्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावाकरिता दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तयार केलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्याचा आधार घेण्यात आला आहे.  त्याआधारे महापालिका प्रशासनाने इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांसाठी बालवाडी शिक्षक आठ, प्राथमिक शिक्षक आणि शिपाई चार अशा नव्या पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीचा  प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.