सरकारी कार्यालयात अधिकारी नाही, योग्य उत्तर नाही, हे सर्वसामान्य माणसांना काही नवीन नाही. सरकारी काम आणि सहा महिने थांब.. या म्हणीचा अनुभव अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना येत असतो. मात्र असाच काहीसा अनुभव शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना अंबरनाथ पालिकेच्या बाबतीत आला आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत हा मुद्दा येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
ठाणे जिल्हा विभाजनानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत आमदार रामनाथ मोते यांनी माहितीच्या अधिकारात पालिका मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र त्यानंतर पाच महिने उलटूनही साधी पोचही न आल्याने आमदारांनी थेट पालिका मुख्यालय गाठले. मात्र पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात शिपाई वगळता एकही अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला. पण तेही कार्यालयात नव्हते.
विशेष म्हणजे आमदार मोतेंच्या पत्राला मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी १७ फेब्रुवारी रोजी उत्तर दिले आहे, मात्र ते पत्र पाठवण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या गलथानपणाचा फटका आमदारांना बसत असेल तर नागरिकांचे काय, असा सवालही आमदारांनी उपस्थित केला.