कल्याण-डोंबिवली पालिकेचे आदेश : दीड महिना काम केलेल्यांची सव्‍‌र्हेक्षणातून मुक्तता

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ४८ खासगी विनाअनुदानित शाळांमधील ४०० प्राथमिक शिक्षकांना करोना प्रतिबंध सव्‍‌र्हेक्षण कामासाठी पालिकेने नियुक्त केले आहे. बहुतांशी शिक्षकांनी हे काम सुरू केले आहे. अशा नियुक्त शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीच्या काळात आपले कार्यक्षेत्र सोडून जाऊ नये, असे आदेश पालिका प्रशासनाने काढले आहेत. त्याच बरोबर खासगी शिक्षकांनी काम सुरू केल्याने, पालिका शिक्षकांनी मागील दीड महिना करोना प्रतिबंध सव्‍‌र्हेक्षणासाठी काम केल्याने त्यांना या कामातून मुक्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गेल्या दीड महिन्यापासून प्रभागवार घरोघर जाऊन पालिका कर्मचारी, वैद्यकीय पथक रहिवाशांच्या आरोग्याची तपासणी करत आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा दुखी याची लक्षणे दिसतात काय याची माहिती पालिकेकडून संकलित केली जाते. या सर्वेक्षणातून करोना साथ रोगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिका हद्दीत करोना रुग्णांची दिवसाची आणि एकूण संख्या वाढू लागल्याने पालिका प्रशासनाने खासगी अनुदानिक शाळांमधील ४०० शिक्षकांना सव्‍‌र्हेक्षण कामासाठी नियुक्त केले आहे. हे काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सर्वेक्षणाचे काम गतिमान होणे आवश्यक असल्याने समोर उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक शिक्षक सुट्टी टाकून गावी जाण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने सर्वेक्षण कामासाठी नियुक्त शिक्षकांनी मुख्यालय सोडून कोठेही जाऊ नये असे आदेश दिले आहेत. अनेक शिक्षकांनी आम्ही आरोग्य कर्मचारी नाहीत. या कामाचा आम्हाला अनुभव नाही असे सांगून कामे करण्यास नकार दिला आहे.

पालिका शिक्षकांची मुक्तता

पालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक मागील दीड महिना कल्याण, डोंबिवली शहरात वैद्यकीय पथकाबरोबर सर्वेक्षण, तपासणी कामात सहभागी झाले होते. अशा सर्व शिक्षकांनी आपली कामे प्रामाणिकपणे पार पाडल्याने या शिक्षकांना त्यांच्या सर्वेक्षण कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. या शिक्षकांच्या जागी खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक सेवा देणार आहेत. खासगी अनुदानित शाळांमधील ४०० शिक्षक सर्वेक्षणासाठी सेवा देणार आहेत. त्यामुळे पालिका शाळांमधील शिक्षकांना सर्वेक्षण कामातून मुक्त करण्याचे आदेश आरोग्य विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी काढले आहेत.