लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ (व्हॉट्सअ‍ॅप बेस्ड् डिजिटल होम असेसमेंट) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्य़ाच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे तसेच पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे.

करोनाकाळात शाळा बंद आहेत. असे असले तरी सध्या ऑनलाइन शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने राज्यात ‘स्वाध्याय’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून दर आठवडय़ाला विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर विषयनिहाय प्रश्न देण्यात येत आहेत. त्याची चाचणीही ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यावर भर देणे, असे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीला मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणित हे दोन विषय सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसात उर्दू माध्यमासाठी हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानवाढीसाठी ‘स्वाध्याय’ उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. यासाठी जिल्ह्य़ातील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बडे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.

सहभागासाठी..

स्वाध्याय उपक्रमात सहभागी होण्यासाठी ८५९५५२४५१८ या क्रमांकावर नमस्कार किंवा HELLO असा मेसेज पाठवावा. ‘स्वाध्याय‘मध्ये सहभागासाठी आणि सराव पूर्ण करण्यासाठी यू-टय़ूबच्या https://bit.ly/MAHASWADHYAY या लिंकवर क्लिक करावे, असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.