कल्याण-डोंबिवलीत मात्र महिलांसाठीच्या बसची चाके रुतलेलीच

ठाणे : शहरी भागातील महिला प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या तेजस्विनी बससेवेची लवकरच ठाणे शहरात सुरुवात होण्याची शक्यता आहे. ठाणे पालिकेने राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून ५० बसगाडय़ा खरेदी केल्या असून या बसवर महिला वाहक नेमण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली आहे. येत्या दोन महिन्यांत ठाण्यात तेजस्विनी बस धावू शकतील, असा प्रशासनाचा दावा आहे.  दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही तेजस्विनी बससेवेचे नियोजन केले आहे. परंतु, राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून बस खरेदी करणेही पालिकेला शक्य झालेले नाही.

ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना राज्य सरकारने महिलांसाठी खास बसेस सुरू कराव्यात असा फतवा मध्यंतरी काढला. ठाणे पालिका हद्दीची लोकसंख्या एव्हाना २२ लाखांच्या घरात पोहचली असली तरी अनेक भागांत अजूनही प्रभावी पद्धतीने परिवहन उपक्रमाला सेवा पुरविता आलेली नाही. घोडबंदर, कळवा, दिवा यासारख्या भागात बससेवेची मोठी मागणी असली तरी टीएमटी व्यवस्थापनाच्या मर्यादा यापूर्वीच उघड झाल्या आहेत. असे असताना दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि सुविधांची कमतरता याचा फटका महिला प्रवाशांना बसू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी खास बस सुरू कराव्यात अशी शासनाची भूमिका आहे. यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांत महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बस खरेदीसाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून या पालिकांना मिळणार आहे. सरकारची ही योजना ठाण्यात तातडीने सुरू व्हावी यासाठी परिवहन उपक्रमाने वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने दिलेल्या निधीतून ५० तेजस्विनी बसेस ठाण्यात दाखल झाल्या आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन उपक्रमाचे प्रमुख संदीप माळवी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या बसेससाठी वाहकही महिला असाव्यात, असा शासनाचा नियम आहे. त्यानुसार ठेकेदार पद्धतीने महिला वाहक नेमण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. लवकरच यासंबंधी निविदा प्रक्रिया राबवून महिला वाहक नेमले जातील आणि शासनाकडून हिरवा कंदील मिळताच महिलांसाठी एकूण ५० विशेष बसगाडय़ा रस्त्यावर धावतील, असा दावा माळवी यांनी केला.

पालिकेने ही योजना राबविण्यासाठी एकीकडे वेगाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अजून या बसेसची खरेदीही केली नसल्याची माहिती पुढे येत आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आर्थिक दुरावस्थेमुळे ठेकेदारांनी महापालिकेकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सुरू  आहे. महापालिकेमार्फत काढण्यात येणाऱ्या अनेक निविदांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र या ठिकाणी नित्याचे बनले आहे. असे असताना तेजस्विनी बस खरेदीसाठी येथील परिवहन उपक्रमास चौथ्यांदा निविदा मागवावी लागली आहे. राज्य सरकारने या शहरासाठी जेमतेम चार महिला बसेस मंजूर केल्या आहेत. त्यादेखील योग्य वेळेत खरेदी केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तेजस्विनी बसगाडय़ांसाठी शासनातर्फे देण्यात आलेल्या तांत्रिक रचनेत बदल करण्याचा निर्णय आता परिवहन उपक्रमाने घेतला आहे.

तेजस्विनी बससेवेसाठी शासनातर्फे  ठरावीक तांत्रिक रचना आखून देण्यात आली आहे. या पद्धतीच्या बसना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तब्बल चार वेळा निविदा काढण्यात आली असली तरी आवश्यकता भासल्यास योग्य ते तांत्रिक फेरफार करून निविदा काढल्या जातील.

– देविदास टेकाळे, परिवहन व्यवस्थापक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका