विलगीकरण कक्षांत दूरचित्रवाणी संच, वायफाय

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये उपचारादरम्यान सकरात्मकता यावी आणि त्याचबरोबर त्यांचा विरंगुळा व्हावा या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दूरचित्रवाणी संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या करोना वार्डमध्ये २५ हून अधिक दूरचित्रवाणी संच बसविण्यात आले असून त्या माध्यामातून रुग्णांना विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सिनेमे दाखवण्यात येत आहे. त्याचबरोबर रांजणोली येथील टाटा आमंत्रा विलगीकरण कक्षात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करोनाबाधित रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि उपचारादरम्यान त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी प्रशासनाने या सुविधा पुरवल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व करोना कक्षांमध्ये २५हून अधिक दूरचित्रवाणी संच बसविले आहेत. या दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून सर्वच करोना रुग्णांना मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह प्रेरणादायी सिनेमे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे येथील रुग्णांचा विरंगुळा होत आहे.

रांजणोली येथील टाटा आमंत्रा गृहसंकुलात सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात अनेक संशयितांना अलगीकरणात ठेवण्यात आले असून १४ दिवस त्यांचा विरंगुळा व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर महापालिका प्रशासनाने याठिकाणी जलद वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या अमर्यादित आणि जलद वायफाय सेवेमुळे विलगीकरणात असलेल्या संशयितांमध्ये सकारात्मत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातही रुग्णांसाठी जलद वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून लवकरच या ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांनी दिली.

संपर्क साधण्यासाठी स्पीकर फोन

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या करोना रुग्णांवर २४ तास डॉक्टरांचे पथक वैद्यकीय उपचार करत आहेत. असे असले तरी सातत्यानेरुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर स्पीकर फोनची मदत घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक करोना कक्षामध्ये स्पीकर फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या फोनच्या माध्यमातून डॉक्टर प्रत्येक रुग्णांशी संवाद साधून त्याची चौकशी करत आहेत. फोनचा आवाज मोठा असल्याने रुग्णाला फोनला स्पर्श करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे संसर्गही टळतो.