चालक, कामगारांना कल्पना नाही; भंगारमाफियाच्या सांगण्यावरून कृत्य
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील रस्त्याच्या विस्तारित कामामधील विजेचे खांब हटवून भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. महापालिकेने या कामासाठी एस. एस. इलेक्ट्रिकल्सचे संजय शाह यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराने गोविंदवाडी जवळील दुर्गामाता चौकात वीज वाहिनीचे भेंडोळे केलेले पिंप (ड्रम) रस्ते काम झाल्यावर टाकण्यासाठी सुरक्षितपणे ठेवले होते. वीज वाहक तारांचे हे पिंप मुंब्रा येथील एका भंगारमाफियाने एका टेम्पोत टाकून भिवंडीमार्गे चोरून नेण्याचा प्रयत्न केला. साडेतीन लाखांची विजेची तार चोरीला गेली आहे, याची माहिती मिळताच खडकपाडा वाहतूक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. वाहतूक पोलिसांनी शिताफिने हालचाली करून चोरीच्या मालाची वाहतूक करणारा टेम्पो माणकोली येथे पकडला.
खडकपाडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश रूपनौर यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून दुर्गाडी किल्ला, कोन, भिवंडी वळण रस्ता येथील नाका पोलीस, नारपोली वाहतूक विभाग यांना एक टेम्पो कल्याणमधून चोरीच्या वीज वाहिन्या घेऊन भिवंडीच्या दिशेने निघाला आहे, असा संदेश दिला. रूपनौरही भिवंडीच्या दिशेने वाहतूक पोलिसांना सोबतीला घेऊन निघाले. तोपर्यंत चोरीचा टेम्पो चालक व त्यामधील कामगारांना आपण वीज वाहक तारांची चोरी करून टेम्पो चालवीत आहोत याची कल्पना नव्हती. टेम्पो चालकाला व त्यामधील कामगारांना भ्रमणध्वनीद्वारे भंगारमाफियाने दुर्गमाता चौकातील वीज वाहक तार मुंब्रा येथे आणणे एवढाच निरोप दिला होता. टेम्पो चालकाला भाडय़ाचे पैसे काम पूर्ण केल्यानंतर मिळणार होते.
रूपनौर यांनी संदेश दिल्यामुळे नारपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाणे, त्यांच्या सहकारी वाहतूक पोलिसांनी माणकोली जवळील राहुल काटा येथे चोरीच्या टेम्पो चालकाला मोठय़ा कौशल्याने अडविले. त्यांची वरात मग बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणली. या टेम्पोतील कामगार, चालकाला आपण चोरून वस्तू नेत आहोत याची जाणीव नव्हती. भ्रमणध्वनीवरून आलेल्या माहितीवरून हे सगळे जण चोरीचे कृत्य करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले आहे. ही वीज वाहक तार मुंब्रा येथे नेऊन तेथून तिची विल्हेवाट लावण्यात येणार होती. पोलीस भंगारमाफियाचा शोध घेत आहेत, असे तक्रारदार संजय शाह यांनी सांगितले. बाजारपेठचे उपनिरीक्षक गीध या प्रकरणाचा तपास करीत आहेत.