01 March 2021

News Flash

पावसाळय़ासाठी तात्पुरते अग्निशमन केंद्र

शीळफाटा, पारसिकनगर, ओवळा भागात पालिकेची ‘बीट स्थानके’

शीळफाटा, पारसिकनगर, ओवळा भागात पालिकेची ‘बीट स्थानके’

पावसाळय़ात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तेथील नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये पहिल्यांदाच अग्निशमन विभागाचे तात्पुरते बीट स्थानक उभारण्यात येणार आहेत. शीळफाटा, पारसिकनगर आणि ओवळा या भागात ही स्थानके उभारली जाणार असून त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणेसह कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे दिवा, कळवा किंवा घोडबंदर परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा वेळ कमी होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या काळात इमारती कोसळून त्यात जीवितहानी होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्याचप्रमाणे नाल्याचे पाणी घरात शिरून घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. पूरसदृश परिस्थितीतही ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले होते. असे असले तरी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या दोन्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये पहिल्यांदाच अग्निशमन विभागाचे तात्पुरते बीट स्थानक उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत पाचपाखाडी, जवाहर बाग, वागळे इस्टेट, कोपरी, बाळकुम, मुंब्रा अशी सहा अग्निशमन स्थानके आहेत. तसेच पारसिक, शीळ-डायघर, दिवा, देसाईगाव, ओवळा, माजिवाडा, रुस्तमजी, हिरानंदानी इस्टेट, आनंदनगर अशी आणखी नऊ स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यांच्या उभारणीसाठी आणखी काही वर्षांचा लागणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत असलेल्या सहा स्थानकांवर संपूर्ण शहराची जबाबदारी असून आपत्कालीन परिस्थितीत त्यांनाच दोन हात करावे लागणार आहेत. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरते बीट स्थानक उभारण्यात येणार आहेत, असे काळे यांनी सांगितले.

कामाचे स्वरूप

  • ओवळा येथील टीएमटी आगाराच्या जागेवर, पारसिक येथे अमित गार्डन हॉटेलजवळ आणि शीळ डायघर येथे आरोग्य केंद्राजवळ ही तीन तात्पुरती बीट स्थानके उभारली जाणार आहेत.
  • ५ जून ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत ही स्थानके कार्यरत असणार आहेत. याठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन आणि त्यासोबत सहा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
  • एखाद्या व्यक्तीने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला किंवा इतर स्थानकांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिल्यानंतर ती लगेचच बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे संबंधित बीट स्थानकांना कळविली जाईल. त्यानंतर येथील पथके तात्काळ घटनास्थळी रवाना होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 12:31 am

Web Title: temporary fire brigade
Next Stories
1 कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त
2 दाऊदचा बुकी सोनू जालानमुळे अरबाज खान अडकला सट्टेबाजीच्या चक्रव्युहात
3 आदिवासी पट्टय़ात भाजपचे वर्चस्व
Just Now!
X