जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची माहिती
हरित महाराष्ट्राच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून २ कोटी झाडे राज्यात एकाच दिवशी लावण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्यापैकी ठाणे जिल्हय़ात १० लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वनीकरण महोत्सवात सामाजिक वनीकरण विभाग ६ लाख ७० हजार, तर महापालिका, नगरपालिका, कृषी खाते व इतर यंत्रणा ३ लाख ३० हजार झाडे लावणार आहेत. यामध्ये नागरिक, विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी दिली.
महसूल व वन विभागाच्या वतीने १ ते ७ जुलै या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून १ जुलैला राज्यात २ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. या वन महोत्सवाचे जिल्हय़ातील नियोजन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, सामाजिक वनीकरण उपसंचालक सतीश फाले, महापालिका, नगरपालिका, पोलीस तसेच हरियालीसारख्या सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

झाडांचे संगोपनही महत्त्वाचे..
वनोत्सवाच्या निमित्ताने जिल्हय़ात १० लाख वृक्षारोपण होणार असून वृक्षारोपण केलेल्या या झाडांची वाढ कशी होईल याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. ठाणे जिल्हय़ाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व खड्डे ३१ मेपूर्वी तयार करण्यात यावेत. लोकांच्या महत्त्वपूर्ण सहभागासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे व त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा, विद्यालये, महाविद्यालये यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगून विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढवावा. सामाजिक संस्थांचा सहभागही यात महत्त्वाचा असून त्यांनाही यात सामावून घ्यावे. महापालिका व नगरपालिका यंत्रणांनीही वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत.प्रथम मोकळय़ा जागांमध्ये ही वृक्ष लागवड करावी. तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागा आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.