२७ गाव रहिवासी संघटनेची लोकांमध्ये जनजागृती

कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागातील भूमिपुत्र म्हणून आगरी समाजाची ओळख आहे. विविध भागांतून येथे स्थायिक झालेल्या रहिवाशांना या भूमिपुत्रांनी नेहमीच भाडेकरू म्हणून संबोधले. हेच भाडेकरू विविध संघर्षांत भूमिपुत्रांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी त्यांच्या समस्या कोणी जाणून घेत नाहीत. त्यांची मते जाणून न घेता या गावांतील संघर्ष समिती राजकारण खेळत आहे. त्यांच्या राजकारणात आमची परवड कशासाठी, असा सवाल करीत या गावांमधील काही भाडेकरूंनी संघर्ष समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचार सुरू केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून वगळण्यात आलेल्या गावांना महापालिकेत समाविष्ट न करता त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी संघर्ष समितीने जोरदार प्रयत्न केले. २७ गावांतील भाडेकरू रहिवासी संघर्ष समितीच्या विरोधात एकवटले असून भूमिपुत्र वगळता इतर लोकांना मोठय़ा प्रमाणात एकत्र आणण्यासाठी त्यांनी भाडेकरूंच्या घरोघरी एक निवेदन पाठविले आहे. २७ गावांत या भूमिपुत्रांनी बेदरकारपणे अनधिकृत बांधकामे केली. रस्ते, गटारे, आरोग्य या समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या आहेत. एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्निशमन दलाचा बंब येण्यासही जागा नाही. ज्यांनी या पायवाटा, रस्ते अनधिकृत बांधकामे उभारून बंद केले त्यांना या समितीने कधी जाब विचारला आहे का, असा सवाल या पत्रकातून उपस्थित करण्यात आला आहे.

गेली ३२ वर्षे आम्ही भूमिपुत्रांसोबत राहिलो. या काळात त्यांनी आपला पाण्याचा प्रश्न तरी सोडवला का, असा सवाल करीत ही गावे असुविधांच्या गर्तेत सापडत आहेत, असा मुद्दा या पत्रकातून व्यक्त केला जात आहे. जमिनी बिल्डरांच्या घशात घालून केवळ भाडेकरूंची फरपट केली जात आहे. आता कुठे पालिकेत ही गावे समाविष्ट होणार तर आमचा विकास होईल असे वाटत असताना समितीने विरोध केला. त्यातही आधी नको नको म्हणत त्यांनी नंतर आपले उमेदवार उभे केले. या सर्व राजकारणाच्या खेळात सामान्य जनता भरडली जात असल्याचा आरोप समितीवर करण्यात आला आहे.

महापालिकेचे समर्थन देणाऱ्यांना पाठिंबा!

३२ वर्षे आम्ही त्यांना संधी दिली. आता ५ वर्षे महापालिकेचे समर्थन करणाऱ्या पक्षाला संधी देऊन पाहू या, असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात येत आहे. लोकांनी मोठय़ा प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडून दुतोंडी वागणाऱ्या संघर्ष समितीच्या उमेदवारांना आपली ताकद दाखवून देऊ या असे आवाहनही या सदस्यांनी या वेळी केले.