दोन गटांतील किरकोळ वादाचे पडसाद

ठाणे येथील अंबिकानगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादातून राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असलेले फलक तलवारीने फाडण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींच्या अटकेसाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतल्याने परिसरातील तणाव निवळला.

अंबिकानगरातील दोन गटांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातून त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद धुमसत होता. त्यापैकी एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला करण्याच्या उद्देशातून सोमवारी रात्री परिसरात दुचाकीवरून फेरफटका मारला. मात्र त्या वेळेस दुसऱ्या गटातील तरुण सापडले नाहीत म्हणून त्यांनी वाचनालयाचा फलक तलवारीने फाडला. या फलकावर राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांनी आरोपीच्या अटकेसाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

या जमावाने अंबिकानगरमध्ये जाऊन परिसर बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना रोखले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. या संदर्भात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याशी संपर्क साधला असता, अंबिकानगरमधील घटनेप्रकरणी चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.