लसीकरणात सेनेकडून पक्षपात होत असल्याचा भाजपचा आरोप

ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून सत्ताधारी शिवसेनेच्या शहरातील शाखांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लसीकरण शिबिरे आयोजित केली जात असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपतर्फे सुरू असलेल्या सेवा सप्ताहात महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबीर घेण्यास पालिकेने नकार दिला. यामुळे भाजपचे खा. विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी संताप व्यक्त करत सत्ताधारी शिवसेना तसेच प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या मोहिमेत पक्षबाजीचे राजकारण सुरू असून त्याचबरोबर पक्षपात केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानिमत्ताने ठाण्यात लस वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण शिबीर घेण्याचे नियोजन पालिकेने केले होते. मनोरमानगर, आझादनगर, मानपाडा, राबोडी आणि बाळकुम या भागांत ही शिबिरे घेण्यासंबंधी भाजपने पालिकेला पत्र दिले होते. परंतु ही शिबिरे घेण्यास पालिकेने नकार दिला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाच्या पक्षपाती निर्णयाबद्दल टीका केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आ. संजय केळकर हे उपस्थित होते. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना तसेच प्रशासनाकडून विशिष्ट पक्षांनाच लसीकरण मोहिमेसाठी प्राधान्य दिले जात असून देशाची लस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची ऊठबस अशी स्थिती आहे, असा आरोपही खासदार सहस्रबुद्धे यांनी केला आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळाली पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या एक-दीड महिन्यांपासून ठाण्यात राजकीय दबावापोटी पालिका प्रशासनाकडून लसीकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वाव दिला जात आहे. लस एका पक्षाची नाही, महाविकास आघाडीची तर बिलकुल नाही. ती केंद्र सरकारची आहे. मात्र, ठाण्यात राजकीय पक्षबाजीसाठी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांना लसीकरणाची शिबिरे दिली जातात. एखाद्या आपत्तीत नागरिकांच्या तोंडचा घास काढून घेणे, हे महाभयानक पाप आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षबाजीमुळे सामान्य नागरिकांना लशीपासून वंचित ठेवणे, हेही पाप आहे. हाच प्रकार महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे. महापालिका प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून लसीकरण मोहीम राबवू नये, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाला भाजपने नेहमीच सहकार्य केले. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना ठाणे पालिकेच्या लसीकरणाबाबतच्या  चांगल्या उपक्रमांची माहिती दिली होती. तसेच त्यांच्याबरोबर आयुक्तांची भेटही घडवून आणली होती. मात्र, भाजपने लसीकरणात कोणतेही राजकारण केले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारचे लसीकरण पंतप्रधानांना समर्पित

संपूर्ण देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जसजसा लशींचा साठा उपलब्ध होतो, त्याप्रमाणे योग्य असे नियोजन करुन ठाणे महापालिका क्षेत्रात लसीकरण केले जाते. आतापर्यंत लसीकरणाचा ११ लाख ५० हजारांचा टप्पा महापालिकेने पूर्ण केला आहे. शुक्रवारी महापालिकेने १९ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण केले असून हे  संपूर्ण लसीकरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट म्हणून समर्पित करीत आहोत,  असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.