९६.६१ टक्के : १० वर्षांचा विक्रम मोडीत; मागील वर्षीच्या तुलनेत १८ टक्कय़ांनी वाढ

जिल्ह्यात यंदा जाहीर झालेला दहावीचा निकाल हा आत्तापर्यंतचा उच्चांकी निकाल असून या निकालाने जिल्ह्यातील गेल्या १० वर्षांचे सर्व विक्रम मोडीत काढले असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे यांनी दिली आहे. जिल्ह्याचा यंदाचा दहावीचा निकाल ९६.६१ टक्के लागला असून या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत १८ टक्कय़ांनी वाढ झाली आहे.

दहावी परीक्षेस जिल्ह्यातील विविध भागांमधून यंदा १ लाख ७ हजार ५४६ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १ लाख ३ हजार ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल आहे. तर, नेहमीप्रमाणे यंदाही उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी बाजी मारली असून जिल्ह्यात नवी मुंबई शहरातील सर्वाधिक ९७.९५ टक्के इतक्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबईपाठोपाठ दरवर्षीप्रमाणे ठाणे शहरानेही उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत ९७.६२ टक्कय़ांची मजल मारली आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील १ हजार २३५ शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये एकूण ५५ हजार २८७ मुले तर ५२ हजार २५९ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ५२ हजार ८५७ मुले तर, ५१ हजार ४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.६० टक्के इतके आहे. तर मुलींनी यंदाही बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के इतके आहे.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अभिनंदन केले आहे.

दहा वर्षांतील टक्केवारी

वर्ष टक्केवारी

२०११     ८८.३९

२०१२      ८८.८७

२०१३      ८८.९०

२०१४      ८९.७५

२०१५   ९३.०१

२०१६       ९१.४२

२०१७       ९०.५९

२०१८   ९०.५१

२०१९  ७८.५५

२०२०     ९६.६१