महानगर गॅस, अमृत योजनेची कामे सुरू

लोकसत्ता प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीतील सुस्थितीत आणि सर्वाधिक रुंदीचा रस्ता म्हणून नावारूपाला आलेल्या ठाकुर्ली खंबाळपाडा येथील ९० फुटी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. धूळ आणि खड्डे यामुळे या भागातील रहिवासी हैराण आहेत. कधी नव्हे ते फेरीवाल्यांनी या भागातील पदपथ, रस्ते अडविण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या वर्षभरापासून ९० फुटी रस्त्यावर अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतील अवजड वाहिन्या रस्त्याखाली चार ते पाच फूट खोल टाकाव्या लागतात. हे काम आव्हानात्मक आहे. वाहिन्या टाकून तात्काळ या रस्त्याचे काम केले तर हा रस्ता लवकर उखडून जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अमृत योजनेबरोबर ९० फुटी रस्ता, म्हसोबा चौक भागात महानगर गॅस कंपनीकडून गॅसवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करताना मोठय़ा प्रमाणात रस्त्याखालून माती, पाणी बाहेर काढले जात आहे. ही वाळलेली माती हवेमुळे व वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे उडते. त्यामुळे रहिवाशांना त्याचा त्रास होतो. डोंबिवलीतून कल्याण शहरात जाण्यासाठी ९० फुटी रस्ता हा मधला मार्ग आहे. पत्रीपुलावरील कोंडीचा प्रश्न निकाली निघाल्याने अलीकडे प्रवासी १० मिनिटांत कल्याणला पोहोचतो. त्यामुळे वाहनचालक ९० फुटी रस्त्याचा वापर करतात. म्हसोबा चौक ते बालाजी अंगण सोसायटीपर्यंतच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहने या भागात एकाच मार्गिकेतून ये-जा करतात. एका बाजूचा रस्ता खडी, माती, खड्डय़ांनी भरून गेला आहे. ९० फुटी रस्ता सुस्थितीत करण्यापूर्वीच वाहिन्या टाकण्याची कामे पालिका अधिकाऱ्यांकडून का करण्यात आली नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

नवीन रस्ता तयार करतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहिन्या टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून ठेवली तर रस्त्यांची वेळोवेळी नासधूस करण्याचे प्रकार घडणार नाहीत. याविषयी पालिका प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील का राहत नाही, असे प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. सकाळ, संध्याकाळ या रस्त्याच्या दुतर्फा निवासी वस्तीतील पदपथ फेरीवाले अडवून बसू लागले आहेत.

९० फुटी रस्त्याची पाहणी करून तातडीने या भागातील अन्य आस्थापनांकडून सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या भागात अमृत योजनेची आणि महानगर गॅस कंपनीकडून कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय ९० फुटी रस्ता सुस्थितीत करता येत नाही. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर योग्य नियोजन करुन ९० फुटी रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल.

– सपना कोळी, शहर अभियंता