रेल्वे महाव्यवस्थापकांची महापालिकांना सूचना
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या वाढत्या अपघातांच्या संख्येत घट व्हावी यासाठी ठाकुर्ली, दिवा आणि खारेगाव येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल उभारण्याचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याच्या दिशेने अखेर हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकुर्ली आणि खारेगाव रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांचे काम रेल्वे करीत असले तरी पुलास जोडणाऱ्या रस्त्याचे काम महापालिकेने करावयाचे आहे. खारेगाव भागातील जोडरस्त्यासाठी संपादित करावयाची जमीन मफतलाल कंपनीच्या मालकीची असून सध्या ती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहे. या तांत्रिकी अडचणी तातडीने दूर कराव्यात अशी सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ठाणे ते कल्याण रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे मार्ग ओलांडताना होणाऱ्या अपघातात शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. लोकलमधील वाढत्या गर्दीतून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. या वाढत्या अपघातांमुळे खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे. वाढत्या अपघातांच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खासदार राजन विचारे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये ठाकुर्ली, दिवा आणि खारेगाव येथील रेल्वे रुळावरील पादचारी पुलांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना सूद यांनी दिल्या. ठाकुर्ली येथील रेल्वे मार्गावर पादचारी पुलाचे काम वेगाने सुरू असले तरी जोडरस्त्याचे काम अद्याप मंदावले आहे. दिवा येथे अजूनही पादचारी पुलाचे काम सुरू नाही, तर खारेगाव पुलाचे काम होत आले असले तरी जोडरस्त्याचे काम जमीन संपादनाअभावी रखडले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासंबंधी पावले उचलावीत, असे आदेश सूद यांनी देताच महापालिका स्तरावर यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे.