लक्ष्मी पार्क सोसायटी कांचनगाव (ठाकुर्ली)
ठाकुर्लीजवळचा नवीन परिसर आता नवीन गृहसंकुले उभी राहात असल्याने विकसित होत आहे. यापूर्वीची या भागातील दलदलीची जमीन पाहिली तर, या भागात गृहसंकुले उभी राहतील असे कुणाला कधी वाटले नव्हते. मात्र हळूहळू मोक्याच्या ठिकाणची, रेल्वे स्थानकाजवळची ठाकुर्ली ते खंबाळपाडा दरम्यानची दलदलीची जमीन विकासकांना खुणावू लागली. त्यानंतर या भागात लक्ष्मी पार्क हा पहिला गृहप्रकल्प विकासक प्रफुल्ल शहा यांनी उभारला. या प्रकल्पात एकूण आठ प्रवेशद्वारे आहेत. पाठीमागे प्रशस्त चार रो हाऊस (ओळीतील घरे) आहेत. अशी ही लक्ष्मी पार्क सोसायटी खाडी किनारी निवांतपणे सभोवतालच्या गृहसंकुलांच्या मध्यभागी राजासारखी उभी आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकापासून पायी दहा मिनिटांच्या अंतरावर लक्ष्मी पार्क आहे. कल्याण खाडीकिनाऱ्याकाठी हा प्रकल्प पाहून लोकलमधून ये-जा करणारे प्रवासी या ठिकाणी कोण राहण्यास येईल, अशी चर्चा करीत असत. कधी होईल का, हा भाग विकसित, अशी प्रश्नार्थक चर्चा करीत असत. मात्र जसजसा गृहप्रकल्प आकाराला येऊ लागला, डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात राहात असलेली, शहरातील घुसमटीला कंटाळलेली अनेक कुटुंबे या नवीन गृहप्रकल्पातील सदनिका पाहण्यास येऊ लागली. सदनिका, रो हाऊस पाहून ग्राहक खूश व्हायचा. घरात वीज नसली तरी, खाडीकिनाऱ्यावरून येणारी मोकळी, स्वच्छ हवा ग्राहकांना भुरळ घालू लागली. सदनिका तर खरेदी करायची आहे, पण आजूबाजूला एकही इमारत नाही. रस्ता मातीचा, फारशी वर्दळ नाही. रात्रीच्या वेळी काळोख अशा अनेक प्रश्नांनी ग्राहक बेजार होऊन जायचा. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत पुढेमागे हा भाग विकसित होईल, आताच जागा घेऊन ठेवू, असा विचार करून, डोंबिवली शहरातील आणि बाहेरून आलेली विविध नोकरदार, व्यावसायिक मंडळी या ठिकाणी सदनिका खरेदी करू लागली. अशा रीतीने आठ वर्षांपूर्वी ठाकुर्लीचा हा परिसर विकसित झाला.
लक्ष्मी पार्क सोसायटीत राहण्यास येणारी कुटुंबे आपल्या हिमतीवर येऊन राहू लागली. एकेक रहिवासी येऊन राहू लागला. तसे अन्य खरेदीदार पुढे आले. शेजार वाढला. एकमेकांची ओळख नाही. विकासक इमारतीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत होता. गृहसंकुलाला प्रशस्त मैदान, वाहनांसाठी ऐसपैस जागा. त्याची भुरळ ग्राहकांना अधिक पडली होती. बघता बघता लक्ष्मी पार्क सोसायटीच्या आठही बाजू रहिवाशांनी खुलून गेल्या. आता सोसायटीचे २८२ सदस्य आहेत. ५० व्यापारी गाळे सोसायटीच्या तळमजल्याला आहेत. एकूण १२०० रहिवासी सोसायटीत राहतात. म्हणजे एक नवीच वसाहत ठाकुर्लीजवळ नव्याने वसली.
सोसायटी सदस्यांची सुरुवातीला एकमेकांशी ओळख नव्हती. प्रत्येक जण निवासासाठी लक्ष्मी पार्कमध्ये यायचा. सकाळीच चाकरीसाठी बाहेर पडायचा. वाहनतळावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात होती. पाणी, वीज काही समस्या असली की, प्रत्येक जण थेट विकासकाशी संपर्क करीत होता. एका ठिकाणी राहूनही सदस्य एका व्यासपीठावर येत नव्हते. त्यामुळे परिसर स्वच्छता, पाणीपुरवठा आदी अडचणी सोडविताना त्यांना बरीच यातायात करावी लागत होती. पुढे या वसाहतीतील काहींना एकीचे महत्त्व पटले. त्यातूनच पराग सातोसकर, सचिन बाबर, मनीष सिंग, अनिल शेलार हे रहिवासी एकत्र आले. विकासकाकडून सोसायटीचा ताबा घेऊन सोसायटी नोंदणीकृत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. २०११ मध्ये लक्ष्मी पार्क सोसायटी नोंदणीकृत झाली. अनेक रहिवाशांना सोसायटीचा देखभाल खर्च द्यायचा असतो, हेही माहिती नव्हते. मालकी हक्काने सदनिका खरेदी केली आहे, आता एक पैसाही सोसायटीसाठी खर्च करायचा नाही, असा एक भ्रम काही सदस्यांमध्ये होता. तो दूर करता करता काही सदस्यांची दमछाक झाली. २०१२ मध्ये सोसायटीने विकासकाकडून मालमत्तेचा ताबा घेतला.
मोकळ्या मैदानात सोसायटी असल्याने परिसरातील उड्डाणटप्पू तरुण या इमारतीच्या गच्चीवर येऊन आपले मौजेचे शौक भागवीत असत. त्यांना बोलण्याची कुणा रहिवाशांची हिम्मत नव्हती. बाहेरची वाहने सोसायटीच्या आवारात ठेवली जात होती. गावगुंडांकडून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात येत होती. पाण्यात राहून माशाशी वैर नको म्हणून हे सारे अन्याय रहिवासी मुकाटय़ाने सहन करीत होते. संघटना स्थापन झाल्यानंतर त्याविरुद्ध आवाज उठविण्याबाबत आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होऊ लागला. सुरुवातीला सोसायटीच्या तिजोरीत ठणठणाट होता. तशा परिस्थितीत वर्गणी जमा करून, सोसायटीच्या मुख्य, पाठीमागील बाजूला भव्य प्रवेशद्वारे बसविण्यात आली. विकासकाकडे लाखो रुपयांची थकबाकी होती. ती रहिवाशांनी स्वत:च्या खिशाला खार लावून समतल करून घेतली. सोसायटीच्या आवारात बाहेरील मंडळींचे गैरप्रकार रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. पगारी दणकट सुरक्षारक्षक सोसायटीत तैनात करण्यात आले. त्यानंतर भूमिपुत्रांना या सुरक्षारक्षकांनी तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली. तसे हळूहळू इमारतीच्या गच्चीवर मौजेची रात्र साजरी करण्यासाठी आलेली मंडळी प्रवेशद्वारातूनच परतू लागली.
सोसायटी स्वच्छ, सुंदर ठेवायची असेल तर दर महिन्याला देखभाल खर्च काढला पाहिजे, हे सदस्यांना सांगण्यात आले. देखभाल खर्च नियमित मिळू लागला. सोसायटीच्या तिजोरीत थोडा निधी झाल्यानंतर, सोसायटीच्या चारही बाजूने ३२ सीसीटीव्ही कॅमेरे प्राधान्याने बसून घेण्यात आले. त्यानंतर चोऱ्यांचे प्रकार कमी झाले. सोसायटी सदस्यांच्या काही तक्रारी असतील त्याचे निराकरण करण्यासाठी दर रविवारी दुपारी १२ ते ३ सोसायटी कार्यालय नियमित उघडे ठेवण्यात येऊ लागले. रहिवाशांच्या प्रश्नांची सोडवणूक कार्यकारी मंडळाकडून करण्यात येत आहे. नियमित बैठका होतात. सोसायटीला हिशेब तपासणीत नेहमी ‘अ’ दर्जा मिळतो.

मोकळ्या हवेस प्रदूषणाचे गालबोट

सोसायटीच्या पाठीमागील बाजूला प्रशस्त चार रो हाऊस आहेत. चारही बाजूने प्रशस्त मोकळी जागा आहे. विविध रंगी, प्रकारची फूलझाडे आहेत. रात्री, पहाटे फुले उमलताना त्यांचा दरवळ परिसरात पसरतो, असे सचिन बाबर सांगतात. संध्याकाळच्या वेळेत मोकळ्या अंगणात खुर्ची टाकून बसले, येथेच शतपावली केली तरी, मन प्रसन्न होते. संध्याकाळच्या वेळेत ठाकुर्ली खाडीकिनाऱ्याच्या दिशेने सूर्य अस्ताला जातानाचे मनोहारी दृश्य सोसायटीच्या आवारातून पाहायला मिळते. फक्त रात्रीच्या वेळेत कधी तरी प्रदूषणाची हवा मात्र रहिवाशांना अस्वस्थ करून जाते. आता सोसायटीच्या चारही बाजूने गृहसंकुल, प्रशस्त ऐसपैस रस्ता झाला आहे.

उत्सवांचा उत्साह
आता सोसायटीचा कारभार आटोपशीर आणि आवाक्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर लक्ष्मी पार्क हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्यात आली. त्यानंतर सोसायटीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी सण मोठय़ा जल्लोषात साजरे केले जाऊ लागले. मुलांना संघटित करून ‘लक्ष्मी पार्क क्रिकेट लीग’ स्थापन करण्यात आली आहे. या उत्सवात सोसायटीतील सर्व सदस्य सहभागी होतात. ज्येष्ठांसाठी येथे शतपावलीसाठी ऐसपैस जागा आहे. सोसायटीचे बहुतेक, खासगी कार्यक्रम या मैदानात होतात. सोसायटीच्या चोहोबाजूने ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, आठ सुरक्षारक्षक तैनात असतात. त्यामुळे घरात आजी आजोबा, ज्येष्ठ नागरिक एकटे असले तरी कोणतीही भीती नसते, असे रहिवासी सांगतात.