ठाकुर्लीतील रेल्वे पोलीस सुरक्षा बलाचा तळ असलेल्या वस्तीची संरक्षक भिंत धोकादायक झाली आहे. या भिंतीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या परिसरातील भाग मुसळधार पावसात कोसळला आहे. भिंतीचा उर्वरित भाग कोसळण्याची दाट शक्यता असल्याने रेल्वेने तातडीने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पादचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवलीतील कल्याणकडे जाणारे बहुतांशी वाहनचालक ९० फुटी रस्त्याकडे जाण्यासाठी पेंडसेनगरमधून ठाकुर्ली हनुमान मंदिराजवळून पुढे जातात. या रस्त्यावरून जाताना ठाकुर्लीत महिला समिती शाळेच्या समोर रेल्वे पोलीस सुरक्षा बळाचा तळ आहे. हा परिसर प्रतिबंधित आहे. या ठिकाणी चोवीस तास जवान तैनात असतात. या तळ असलेल्या वस्तीच्या संरक्षित भिंती मुसळधार पावसाने जागोजागी कोसळल्या आहेत. ढिगारा पदपथावर पडून आहे. भिंत दगडांची असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकुर्ली बाजारातून वळण घेतल्यानंतर डोंबिवलीकडे पेंडसेनगरमध्ये वाहनाने, पायी जाताना या संरक्षिक भिंतीच्या कडेने जावे लागते. सर्वाधिक वर्दळीचा हा भाग आहे. या भागातून ये-जा करताना पादचारी, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वेने या संरक्षित भिंतीविषयी काळजी घ्यावी. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आपण रेल्वे अधिकाऱ्यांना करणार आहोत, असे स्थानिक नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.