ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील काम रखडले
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थानक ते पूर्व भागातील म्हसोबानगर संतवाडी दिशेने रेल्वेने स्कायवॉक उभारण्याचे काम सुरूकेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरूआहे. परंतु या कामाची गती अतिशय संथ असल्याच्या प्रतिक्रिया या भागातून नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून देण्यात येत आहेत.
ठाकुर्लीजवळ रेल्वे मार्गाला वळण आहे. त्यामुळे रेल्वे फाटक ओलांडताना किंवा कचोरे, नवीन सर्वोदय वसाहतीमधून येणारा प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडत असताना, त्यांना डोंबिवली किंवा कल्याण दिशेने येणाऱ्या लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाडीचा अंदाज येत नाही. रेल्वे मार्ग ओलांडणारा प्रवासी दोन्ही दिशेने लोकल आल्याने भांबावून जातो आणि अपघात होण्याचा धोका संभवतो. गेल्या रविवारी दुपारी ठाण्याहून ठाकुर्लीत आलेल्या चार जणांचा अपघात झाला. ठाकुर्लीतील वळण रस्त्यामुळे अनेक वर्षांपासून या भागात अपघात होत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.
ठाकुर्ली चोळे भागाचे माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाच्या पाठीमागे लागून ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते म्हसोबानगर संतवाडी भागात स्कायवॉक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून रेटून धरली. अखेर या प्रयत्नांना यश आले. दोन महिन्यांपासून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात संतवाडीच्या दिशेने स्कायवॉक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. संतवाडी झोपडपट्टीच्या बाजूला दोन खड्डे खणून ठेवण्यात आले आहेत. पुढे काम गती घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. स्कायवॉकची उभारणी आणि त्यावरच संतवाडीच्या दिशेने तिकीट खिडकी रेल्वे प्रशासनाने सुरू करावी, जेणेकरून कचोरे, नवीन सर्वोदय वसाहतीकडून येणाऱ्या प्रवाशाला रेल्वे फाटकाच्या दिशेने जाऊन तेथील तिकीट खिडकीवर तिकिटे काढण्याचा द्राविडीप्राणायाम करावा लागणार नाही, असे या भागातील रहिवासी पराग सातोसकर यांनी सांगितले.
नाल्यावरील मार्ग बंद होईल
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारा प्रवासी या भागातील नाल्यावरून पुढचा प्रवास करतो. अनेक वेळा रात्रीच्या वेळी काही प्रवासी या नाल्यात पडतात. स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर हा मार्गही बंद करणे शक्य होणार आहे. कचोरे, नवीन सवरेदय वसाहत, एमआयडीसी भागातून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून आजघडीला सुमारे ३० ते ४० हजार प्रवासी मुंबई, कसारा, कर्जतच्या दिशेने प्रवास करतात. दर महिन्याला ठाकुर्ली रेल्वे स्थानकात प्रवासी भाडय़ातून मध्य रेल्वेला ८० लाखांचा महसूल मिळत आहे.