ठाकुर्ली ते पत्रीपूल रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी पत्रीपूल कुष्ठरुग्ण वसाहतीजवळील पालीवाल डी. एड. महाविद्यालयाच्या अकरा खोल्या व पाच निवासी खोल्या पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केल्या.

ठाकुर्ली ते पत्रीपूल दरम्यान नव्वद फुटीचा रस्ता पालिकेने तयार केला आहे. डोंबिवलीतील वाहतूक कोंडी दूर करणारा आणि वाहतुकीचे विभाजन करणाऱ्या या रस्त्यामध्ये पत्रीपुलाजवळील पालिवाल महाविद्यालयाच्या खोल्या, कचोरे येथील रेल्वेची जमीन मोठा अडथळा होती. सार्वजनिक रस्त्यासाठी ही बांधकामे तोडणे आवश्यक असल्याने प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार, शांतीलाल राठोड, अरुण वानखेडे यांच्या पथकाने कोणत्याही विरोधाला न जुमानता कचोरे ते पत्रीपूल रस्ते कामाला अडथळा ठरणारी बांधकामे जमीनदोस्त केली.

कचोरे खदान, मोहन आर्केड ते पत्रीपूल दरम्यान रेल्वेचा दोनशे मीटर जमिनीचा पट्टा रस्तारुंदीकरणात येत आहे. रेल्वे प्रशासन पालिकेला हा पट्टा देण्यास विरोध करीत आहे. रस्त्यासाठी जमीन हवी असेल तर बाजारभावाप्रमाणे २४ कोटीचा रेल्वेकडे भरणा करा किंवा तेवढय़ाच किमतीची जमीन रेल्वे मार्गालगत रेल्वे प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून पालिकेकडे करण्यात येत आहे. पालिकेने काही जागा रेल्वे अधिकाऱ्यांना दाखविल्या, पण त्या जागांना त्यांनी पसंती दिली नाही.