गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत चार महिन्यांत दहा टक्क्यांची वाढ

मानसी जोशी, ठाणे</strong>

रुग्णाला बाहेरील रक्तपुरवठय़ावर अवलंबून ठेवणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ या आजाराबद्दल आजही भारतात पुरेशी जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. या आजाराचे परिणाम आणि लक्षणे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाणे जिल्ह्यात थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात २०१७ साली ४०० थॅलेसेमियाचे रुग्ण होते, ती संख्या २०१८ मध्ये ५०० वर गेली, तर यंदाच्या वर्षीच्या चार महिन्यांतच रुग्णांच्या संख्येत दहा टक्क्यांची भर पडून ती ५६१ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागांमध्ये विशेषत: आदिवासी पाडय़ांत थॅलेसेमिया या आजाराविषयी अजूनही अनभिज्ञता      आहे. जवळच्या नातेसंबंधांतच लग्न करण्याचे प्रमाणही या पट्टय़ात जास्त आहे. अशा प्रकारच्या नात्यांतील शरीरसंबंधांतून जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाचा धोका अधिक असतो, असे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

शरीरातील लाल पेशी कमकुवत अथवा नष्ट झाल्याने थॅलेसेमिया आजार होत असल्याचे डॉक्टर सांगतात. जिल्हा रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांचे समुपदेशन करण्यात येते. रुग्णांची हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरायसीस नावाची चाचणी डॉक्टरांकडून करण्यात येते. चाचणीच्या अहवालानंतर रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेनुसार त्याची विभागणी करण्यात येते. थॅलेसेमिया या आजाराचे अधिक आणि अल्प प्रमाणात रुग्णांचे वर्गीकरण करण्यात येते. थॅलेसेमिया आनुवंशिक आजार असल्याने माता-पित्यामधील एका व्यक्तीला थॅलेसेमिया असल्यास त्यांच्या मुलास आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात थॅलेसेमिया आजाराची चाचणी करून घेण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

जनजागृती मोहीम

ठाणे जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयातर्फे  ग्रामीण भागात थॅलेसेमिया आजाराविषयी जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येते. नुकतीच ही मोहीम पार पडली. या मोहिमेत भिवंडी येथील चिंबीपाडा आणि शहापूरमधील आगई या आदिवासी भागांत जाऊन तेथील मुलांची थॅलेसेमिया चाचणी डॉक्टरांनी केली. तसेच गावकऱ्यांना या आजाराविषयी माहिती, उपचार यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये २५ ते ३० रुग्णांमध्ये थॅलेसेमिया आणि सीकलसेल या आजारांची लक्षणे आढळली.

थॅलेसेमिया आजार काय आहे?

जन्मत: गुणसूत्रे नसल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन वाहून येणाऱ्या लाल पेशींमधील उपयुक्त घटक असतो. त्यामुळे रक्तातील लाल पेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. या कारणामुळे शरीरात नवीन रक्त तयार होत नाही. म्हणून थॅलेसेमिया झालेल्या रुग्णास बाहेरून रक्त घेण्याची गरज भासते.  रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने हाडे ठिसूळ होणे आणि हृदयाचे आजार होण्याचा संभव असतो. रुग्णामध्ये थॅलेसेमिया आजार बळावल्यास रुग्णास बाहेरून रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. रुग्णास आठवडय़ातून दोन ते तीन वेळा रक्त देण्यात येते. तर अल्प प्रमाणात असल्यास हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय केले जातात.

थॅलेसेमिया आजाराच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा रुग्णाला या आजाराची माहिती होत आहे. आजाराचे निदान झाल्यावर रुग्ण लवकर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात. या कारणांमुळे थॅलेसेमिया हा आजार नियंत्रणात आलेला आहे.

– कैलाश पवार, शल्यचिकीत्सक, ठाणे शासकीय रुग्णालय