घडाळ्याच्या काटय़ावर आयुष्य जगताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ असणे गरजेचे असते. दैनंदिन कामातून शरीर आणि मनाला दिलासा मिळण्यासाठी योग साधनेची आवश्यकता असते. केंद्र सरकारतर्फे २१ जून हा योग दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ठाण्यातील विविध महाविद्यालयांत योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि कर्मचारीही या योग प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

बा.ना. बांदोडकर महाविद्यालय

ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर

बा. ना. बांदोडकर विज्ञान व जोशी-बेडेकर महाविद्यालयात संयुक्तपणे योग दिन साजरा झाला. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जागतिक योग दिना’चे हे दुसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांनाही योगाची माहिती व्हावी या अनुषंगाने महाविद्यालयात योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षकांतर्फे योग प्रशिक्षण देण्यात आले. बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी, राष्ट्रीय सेवा योजना, जिमखाना आणि वुमेन डेव्हलपमेंट सेल यांच्यातर्फे महाविद्यालयातील पतंजली सभागृहाच्या प्रांगणात योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अंबिका योग कुटिरचे योग शिक्षक व महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. आठल्ये यांनी भूषविले. स्वामी विवेकानंद केंद्राच्या डॉ. सुरभी जोशी यासुद्धा योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत्या. सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगाचे प्रशिक्षण घेतले. एन.सी.सी. आणि एन.एस.एस.चे कॅडेट्स तसेच एस. बी. शहापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासाठी उपस्थिती दर्शवली. एन.सी.सी. महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार राजेश खेवले हेही या उपक्रमात सहभागी झाले.  विद्यार्थ्यांनी योगाचे आचरण दैनंदिन जीवनात केले पाहिजे असे प्रतिपादन एन.सी.सी.चे समनव्यक प्रा. बिपीन धुमाळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर न्यायते  तसेच प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जोशी बेडेकर महाविद्यालय

ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर

जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहातही योग दिवस साजरा करण्यात आला. या योग कार्यक्रमात शलभासन, शवासन, प्राणायाम, ओंकार ही योगासने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केली. योग गुरु अद्वैता बापट यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ. वरदराज बापट (आय.आय.टी. मुंबई) यांनी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपनगर प्रमुख सीमा नित्सुरे यांनी कार्यक्रमात योगाविषयी मार्गदर्शन केले. विवेकानंद स्टडी सर्कलचे चेअर पर्सन प्रा. इंद्राणी रॉय व एन.एस.एस.च्या समनव्यक कल्पना रामदास यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम पार पडला. शासनाने नित्य अभ्यासक्रमातही योगाचा समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.संतोष राणे यांनी योग दिन कार्यक्रमात केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आयुष्य जगण्यासाठी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सीएचएम महाविद्यालय

मानसी जोशी, युवा वार्ताहर

जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून उल्हासनगरच्या सी.एच.एम. महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभागातर्फे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजू लालवानी पाठक, एन.सी.सी.चे शाशिधाल पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने १८, २० आणि २१ जून रोजी तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. प्राणायाम, कपालभारती, अनुलोम-विलोम हे श्वसनाचे तसेच व्यायामाचे प्रकार घेतले. नॅॅशनल कॅडेट कोरतर्फे विद्यार्थ्यांसाठी श्रीकांत शेलार यांनी योगवर्ग घेतले. अतिशय करायला साधी आणि सोपी अशी धनुरासन, ताडासन, पर्वतासन अशी आसने घेतली. प्रत्येक आसनाचा शरीरास होणारा उपयोग त्यात सांगण्यात आला. ४० ते ५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. सी.एच.एम. महाविद्यालय हे सलग तीन वर्षे महाविद्यालयीन स्तरावर योग या क्रीडा प्रकारात पहिले येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सर्वात शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान अर्धा तास तरी व्यायाम आणि योगासने करेन अशी मनाशी प्रतिज्ञा करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

के.एम. अग्रवाल महाविद्यालय

कल्याणच्या के.एम. अग्रवाल महाविद्यालयातही उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. अनिता मन्ना यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रा. वैशाली पाटील, रोहिदास सानप, विश्वास जाधव आणि एन.सी.सी.च्या स्मिता पिंपककर, सुजित सिंग आणि उदय सिंग या वेळी उपस्थित होते.

दृष्टिहिनांसाठी ‘वझे व्हिजन’

जतीन तावडे, युवा वार्ताहर

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारची  ई-संसाधने वापरता यावीत म्हणून ‘वझे व्हिजन’ हे नवीन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी तीन संगणक व हेडफोनची सुविधा देण्यात आली असून त्याद्वारे संगणकांमधील ‘स्क्रीन वाचक सॉफ्टवेअर’च्या साहाय्याने मॉनिटरवरील सर्व मजकूर हेडफोनच्या मदतीने ऐकता येतो. या ‘टॉकिंग सॉफ्टवेअर’चा वापर करून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील ई-संसाधनांचा तसेच ‘टॉकिंग बुक्स व ई-बुक्स’चा वापर करता येतो. ई-संसाधनांच्या वापराकरिता हे केंद्र असले तरीही ब्रेलमधील काही ग्रंथही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लायब्ररी कार्ड्स दिली जातात, तसेच प्रत्येक इयत्तेतील गुणवंत विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त पुस्तक वाचण्यासाठी ‘स्कॉलर्स कार्ड’ दिले जाते. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता पुस्तक पेढी योजनाही राबवली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचा संच वर्षभर वापरण्यासाठी दिला जातो. ग्रंथालयाचे संगणकीकरण करण्यात आले असून ग्रंथांवर बार-कोड लावण्यात आले आहेत. सर्व विद्याथ्र्र्याना बारकोड लावलेली लायब्ररी कार्ड्स दिली जात असल्यामुळे सर्व देवघेवीचे काम संगणकीकृत होऊन विद्यार्थ्यांना जलदगतीने सेवा दिली जाते. संदर्भ विभाग व नियतकालिक विभागात ‘ओपन अ‍ॅक्सेस’ पद्धत राबवली जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत: मनसोक्तपणे ग्रंथ व नियतकालिके हाताळता येतात. महाविद्यालयाच्या भित्तिफलकावर ग्रंथालयातर्फे दर आठवडय़ाला विविध विषयांवरील नामांकित व्यक्तींचे लेख विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात.

महागाई कमी करण्यासाठी रासायनिक प्रयोग

जतीन तावडे, युवा वार्ताहर

सध्या भारतात दिवसेंदिवस महागाई वाढत असून चैनीच्या वस्तूंसोबत जीवनावश्यक वस्तूंचे भावही वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या वझे महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग महागाई कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या प्रकल्पाचे नाव आहे – ‘सॉलिड स्टेट केमिस्ट्री अप्लाइड इन कॅटेलिसिस अ‍ॅन्ड मटेरिअल सायन्स’.  महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. गुलाबशंकर दुबे आणि डॉ. परेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस्सी. आणि पीएच.डी.चे सहा विद्यार्थी या प्रकल्पावर काम करीत आहेत. या प्रकल्पात रासायनिक प्रक्रियेद्वारे स्पिनल आणि फेराइड्स तयार केले जातात, त्यांचा उपयोग करून काही  वस्तूंच्या किमती कमी करणे शक्य आहे. विशेषत: त्यामुळे औषधे, दुग्धजन्य पदार्थ, कीटकनाशके आदी वस्तूंच्या किमती २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतील. तसेच दररोजच्या जीवनातील मल्टिलेअर चीप इंडक्टर, सेल्युलर फोन, नोटबुक, संगणक व्हिडीयो कॅमेऱ्यामध्येही याचा उपयोग होतो.

महाविद्यालयाच्या तयारीची कार्यशाळा

ठाणे : दहावी आणि बारावी हे शिक्षणाचे टप्पे पार केल्यावर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयाची नवीन पावले विद्यार्थ्यांना खुणावतात. या नवीन अनुभवाशी जुळवून घ्यायला मुलांना मानसिक समतोलासाठी मदत करावी लागत. ताणाचे व्यवस्थापन करत उज्ज्वल यशाकडे वाटचाल कशी करता येईल याविषयी विद्यार्थी आणि पालकांसाठी इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संस्थेमार्फत मुले व पालक यांच्यासाठी एकत्र कार्यशाळा रविवार, २६ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.  महाविद्यालय जीवनाचा व्यक्तिमत्त्व तसेच करिअर घडवायला खूप उपयोग असतो. या संधीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार पालक आणि मुलांनी एकत्रित करणे आवश्यक आहे, अशा बाबींवर अरुण नाईक या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी संध्या भास्कर (९८७०११५६९३) या क्रमांकावर संपर्क साधावा.