कासारवडवली हत्याकांड
कासारवडवली गावातील हत्याकांडासंबंधी कोणताही धागादोरा पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे त्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. असे असले तरी घरातील चौदा जणांची हत्या करून स्वत: आत्महत्या करणाऱ्या हसनैन याने बँक तसेच नातेवाईकांकडून कर्ज घेतल्याची माहीती पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे यातूनच त्याने हे हत्याकांड घडविले तर नसावे ना, असा संशय ठाणे पोलिसांना येऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनीही त्या दिशेने तपास सुरू केला असून त्यासाठी जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तसेच त्यासोबतच सर्वच अंगांनी तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हत्याकांडानंतर घरातून चार मोबाइल आणि हसनैन याचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला होता. चारपैकी एक मोबाइल हसनैनचा आहे तर उर्वरित मोबाइल घरातील अन्य जणांचे होते. या चारही मोबाइल आणि लॅपटॉपची तपासणी ठाणे सायबर गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत करण्यात आली असून त्यामध्ये या घटनेसंबंधीचा कोणताही धागादोरा हाती लागू शकलेला नाही. तसेच या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असून या प्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडेही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात ठोस माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे या हत्याकांडामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डुम्बरे यांनी दिली.

घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून हसनैन याने बँकेकडून कर्ज घेतले होते. तसेच एका बहिणीकडूनही त्याने कर्ज घेतले होते. यातूनच त्याने हे हत्याकांड घडविल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी डुम्बरे यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकरणाचा सर्वच अंगांनी तपास सुरू असल्याने ही शक्यताही पडताळून पाहण्यात येत आहे. त्यासाठी हसनैनच्या मेहुण्यांकडे याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांच्या रक्ताचे नमुने, अन्नाचे नमुने तपासणीचा आणि शवविच्छेदन अहवाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुबियाचा प्राथमिक जबाब नोंदविण्यात आला असून त्यामध्ये तिने संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली आहे. ‘मैने सब घर वालो को खत्म किया है तुम्हे भी नही छोडूंगा’ असे सांगत हसनैन त्याच्या हातातील सुऱ्याने माझ्या गळ्यावर वार केला. मी तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला, तरीही तो वार माझ्या गळ्याला लागला. त्यानंतर मी त्याला ढकलून दिले आणि आतल्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतल्याने बचावली, असे तिने जबाबात म्हटले आहे. तसेच त्याने असे का केले, याचे कारण मला अद्याप समजलेले नाही, असेही तिने त्यात म्हटले आहे. त्यामुळे या हत्याकांडामागचे गूढ अद्याप कायम आहे.