अखेर ठाणे ते कल्याणदरम्यान खाडीत सुरू असलेल्या अनिर्बंध रेती उपशाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची सुरुवात जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केली आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे स्वार्थासाठी खाडीचे लचके तोडणाऱ्यांना जरब बसून येथील पर्यावरणाची होणारी हानी रोखली जाईल, अशी आशा पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत. डॉ. अश्विनी जोशी आणि डॉ. महेंद्र कल्याणकर या दोन आजी-माजी जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल..

वाळू.. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामधील महत्त्वाचा ऐवज. पूर्वीच्या काळी गाव, शहरातील एक-दोन माणसे जवळच्या नदी, खाडीत जाऊन घमेल्याच्या साहाय्याने नदी, खाडीत उतरून डुबी मारून रेती काढत असत. ग्रामीण लोकजीवनातील तो एक जोडव्यवसाय होता. तीन ते चार तास खाडी, नदीत डुबी मारून घमेल्याने रेती काढायची. ती किनाऱ्यावर आणून बैलगाडीने गरजू माणसाला विकायची. पुढे वाळूची गरज वाढली तशी घमेली, बैलगाडय़ा गायब झाल्या. त्याची जागा ड्रेझर, सक्शन पंप, अद्ययावत यंत्रणांनी घेतल्या. खाडीकिनारे अद्ययावत यंत्रणांनी इतके भरून गेले की, तिथे रेतीचा कारखाना आहे की काय असे वाटावे. वाळू विक्रेत्यांचा खाडीकिनाऱ्यांवर इतका दबदबा होता की, तेथे सर्वसामान्य सोडा; कोणी पर्यावरण, निसर्गप्रेमी, महसूल विभागाचा तलाठी, मंडल अधिकाऱ्याचीही जाण्याची टाप नव्हती. त्या वेळी खाडीकिनारचे वाळूचे पट्टे लिलाव बोलीने महसूल विभागाकडून रेती व्यावसायिकांना दिले जात होते. दिलेल्या मोजमापात व्यावसायिकाने वाळूउपसा करून त्याची विक्री करावी, असा दंडक होता. मात्र नफेखोरी वृत्तीच्या रेतीमाफियांनी हा दंडक मोडला. त्यासाठी प्रसंगी महसूल यंत्रणेला हाताशी धरले. अगदीच एखादा प्रामाणिक अधिकारी असेल तर त्याची बदली करून बंदोबस्त करण्याची क्षमता हे वाळूमाफिया बाळगून होते. स्थानिक नेतेमंडळी मंत्रालयातील उच्चपदस्थ आणि मंत्र्यांशी संधान साधून असायची. त्यातून हा काळा व्यवसाय फोफावला. त्यामुळे काही अपवाद सोडले तरी बाकीचे अधिकारी खाडीतल्या या लुडबुडीकडे कानाडोळा करीत असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एखाद्या नेत्याने कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची नोंद रजिस्ट्ररमध्ये केली जाते. त्यामुळे तथाकथित पुढारी आता या भानगडीत पडत नाहीत.

वाळूतस्करांचा उदय

टिटवाळा, गंधारे, उंबर्डे, सापर्डे, कल्याणमधील दुर्गाडी, बाजारपेठ रेतीबंदर, कोन, डोंबिवली रेतीबंदर, मोठागाव, नवापाडा, कोपर ते मुंब्रा या तीस ते पस्तीस किमीच्या खाडीपट्टय़ात अनेक वर्षे वाळूउपशाचा व्यवसाय चालायचा. या पट्टय़ातील बडे तीन ते चार धनाढय़ शासकीय लिलाव बोलीने खाडीतील रेतीउपशाचे पट्टे घ्यायचे. वाळूउपशाची एकूण सामग्री डम्पर, ड्रेझर, सक्शन पंप, त्यावरील कामगार असा लवाजमा पाहिला तर केवळ सरकारी लिलाव बोलीच्या चौकटीत राहून हा सगळा कबिला पोसणे किंवा हा व्यवसाय करणे शक्य नव्हते. व्यावसायिक अधिकृत एकपट अधिकृत रेती उपसा आणि त्याच्या कित्येक पट बेकायदा रेतीउपसा करून आपला गाडा चालवायचे. १९८० नंतर ठाण्यापासून ते कल्याण- डोंबिवलीपर्यंत लोकवस्ती वाढली. बांधकाम व्यवसाय वाढला. त्या प्रमाणात वाळूची गरज वाढत गेली. वाळू व्यावसायिक हळूहळू ‘वाळू तस्करा’च्या भूमिकेत गेले. झटपट, बेहिशेबी पैसा मिळविण्याचे वाळू हे साधन झाले. वाळू व्यावसायिक अधाशीपणाने खाडीकिनारची वाळू खारफुटी (कांदळवन-मॅनग्रोव्ह), जैवविविधता नष्ट करून उपसू लागले. कल्याण, डोंबिवली, कोपर, दिवा, आयरे, मुंब्रा, ठाणे खाडीदरम्यानचा शेकडो एकरचा कांदळवनाचा पट्टा वाळूतस्करांनी गेल्या पंचवीस वर्षांत नष्ट करून टाकला. वाळूउपशाचा व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही विद्यापीठाची पदवी असण्याची आवश्यकता नव्हती. जवळच्या खाडीत रेतीचे काम सुरू झाले की हे झाले ‘वाळूचे शेठ’. या वाळू व्यावसायिकांना वाळूउपशाबाबत तलाठी, मंडल अधिकाऱ्याने विचारण्याचे, कारवाईचे धाडस केले तर पुन्हा गेल्या रस्त्याने परत येण्याची या कर्मचाऱ्यांना शाश्वती नसायची.

तस्करांना धडा

पर्यावरण संवर्धनाबाबत राष्ट्रीय हरित लवाद, उच्च, सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी बंधनकारक असल्याने ठाणे जिल्हा महसूल विभागाने त्याचे काटेकोर पालन करणे सुरू केले आहे. शासनाने वाळूतस्करांवर ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटीज-झोपडपट्टी दादा) कायद्यांतर्गत कारवाईचा निर्णय घेतला आहे. कल्याण ते मुंब्रा परिसरातील वाळूतस्करांची खाडय़ांना लागलेली ‘वाळवी’ नष्ट करायची असेल तर तस्करांना जन्माची अद्दल घडविणे आवश्यक आहे. म्हणून डॉ. कल्याणकर यांनी आयुक्त सिंग यांच्याशी चर्चा करून डोंबिवलीतील पट्टीचा वाळूतस्कर हनुमान म्हात्रे याला ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध करण्याची मागणी केली होती. अज्ञात वाळूतस्करां विरुद्ध कारवाईसाठीचा अहवाल कल्याण तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला पाठविला होता. हनुमानला पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्याने स्थानबद्ध करून त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील वाळूतस्करांवर झालेली ही अशी पहिलीच कारवाई आहे. वाळूतस्करांना हा मोठा इशारा आहे. कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, टिटवाळा, नवापाडा, उंबर्डे, सापर्डे, परिसरांत असे अनेक अज्ञात ‘हनुमान’ वर्षांनुवर्षे वाळूचा बेसुमार उपसा करून खाडीचे लचके तोडत आहेत. त्यांच्यावर अशीच कारवाई करून खाडी वाचवावी, अशीच अपेक्षा पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.

वाळूचे अड्डे उद्ध्वस्त

पैशासाठी मेलेली नजर, ‘पर्यावरण’ शब्दाशी कधीही गाठ न पडलेले हे तस्कर खाडीतील रेती बिनदिक्कत उपसा करू लागले. अशाच पिलावळीतून हनुमान राजाराम म्हात्रेसारखे अनेक वाळूतस्कर उदयास आले. वाळूतस्कर ही ठाणे जिल्ह्य़ातील नदी, खाडय़ांना लागलेली मोठी ‘वाळवी’ आहे; हे तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी अचूक हेरले. त्यांनी पहाटे, रात्री, दिवसा पोलीस बोटीतून खाडीकिनाऱ्यातून प्रवास करून वाळूतस्करांना जेरीस आणले होते. भिवंडी कोन येथील गोदामांवर त्यांची वक्रदृष्टी पडली. अखेर राजकीय दबावातून त्यांची बदली झाली. जोशी यांचे उर्वरित काम जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तितक्याच क्षमतेने पूर्ण केले. त्यांनी कल्याण, भिवंडी प्रांत, शहापूर, मुरबाड, भिवंडी, वाडा परिसरातील तहसीलदार, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या सहकार्याने वाळूतस्करांच्या कल्याणमधील बाजारपेठ रेतीबंदर किनाऱ्यावरील अड्डय़ावर एप्रिलमध्ये छापा टाकला. दिवसभर दडून बसायचे आणि रात्रीचे कल्याण ते मुंब्रा परिसरातील किनारे वाळूसाठी उखडून टाकायचे, हे या तस्करांचे लक्ष्य असायचे. महसूल विभागाने या तस्करांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर ते पळून जायचे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्याशिवाय महसूल अधिकाऱ्यांसमोर पर्याय नसायचा. दुर्गाडी रेतीबंदर कारवाईत तस्करांची ७२ कोटींची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. ९० लाखांची वाळू साठय़ात सापडली. रेतीसाठय़ाचे १३२ हौद नष्ट केले. ७२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामधील २४ तस्कर अज्ञात आहेत. एवढी मोठी कारवाई होऊनही ऑगस्टमध्ये डोंबिवली मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी वाळूउपशाला चटावलेले तस्कर बिनधास्तपणे रेतीउपसा करीत होते. संध्याकाळी सात ते पहाटे सहा वाजेपर्यंत हे काम चालायचे. याविषयी ‘लोकसत्ता ठाणे’ सहदैनिकाने वृत्त देताच कल्याणचे प्रांत अधिकारी प्रसाद उकार्डे, नायब तहसीलदार अभिजित खोले यांनी सलग दोन दिवस कारवाई करून या भागातील वाळूतस्करांचे हौद, यंत्रसामग्री नष्ट केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात २४ अज्ञात तस्करांविरोधात गुन्हे दाखल केले. पारदर्शक, धडाकेबाजपणे व दबाव झुगारून काम करण्याचे परीणाम या कारवाईने दाखवून दिले आहे.